बीड
लाखोंच्या उपस्थितीत आज भावभक्तीचा काला महंत शिवाजी महाराज यांचे कीर्तन, संत-महंतांसह भाविकांची उपस्थिती

लाखोंच्या उपस्थितीत आज भावभक्तीचा काला
महंत शिवाजी महाराज यांचे कीर्तन, संत-महंतांसह भाविकांची उपस्थिती
कोळगाव बाळासाहेब घाडगे – राक्षसभूवन येथे गेल्या सात दिवसांपासून श्री क्षेत्र नारायण गडाचा ७३ वा नारळी सप्ताह सुरू असून अध्यात्म, समाजप्रबोधन व नामजपाचा जागर सुरू आहे. या सप्ताहात आज गुरुवार दि.१७ एप्रिल रोजी महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. यानंतर भाविकांना भावभक्तीचा कालारुपी महाप्रसाद दिला जाणार आहे. यावेळी संत-महंतांसह लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत.
बीड जिल्ह्यातील राक्षसभूवन ता शिरूर कासार येथे दि.१० एप्रिल पासून सात दिवसांपासून भक्तीमय व आनंदी वातावरणात काकडा, गाथा भजन, रामकथा, प्रवचन, हरिपाठ व नामसंकीर्तन आदी कार्यक्रम सुरू आहेत. या सप्ताहात सात दिवस भाविकांना महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार यांचे ज्ञानामृतरुपी विचार श्रवण करण्यास मिळाले. भक्तीमय वातावरणात सुरू असलेल्या या सप्ताहाची आज महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे. महाप्रसादासाठी १११ क्विंटल साखरेपासून तयार केलेला बुंदीचा महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. काल्याचे कीर्तन व महाप्रसादास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राक्षसभूवनसह परिसरातील ग्रामस्थांनी केले आहे.
……. चौकट
रामकथा जीवन जगण्याचा मार्ग- रामायणाचार्य समाधान महाराज
राक्षसनुभवान येथील नारळी सप्ताह राम कथेचे आयोजन करण्यात आले होते. रामकथा हा आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे, आज कुटुंबात वाद होतात, भावाभावात वाद होतात, यामुळे कुटुंब उध्वस्त होते, कुटुंबात आनंद बहरावा, प्रगती व्हावी व आदर्श जीवन जगता यावे यासाठी रामकथा जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे प्रतिपादन समाधान महाराज शर्मा यांनी केले. रामकथेची बुधवारी सांगता झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला पुरूष भाविकांची मोठी उपस्थिती होती.
मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – सप्ताह समिती व ग्रामस्थ
राक्षसभूवन येथे सुरू असलेल्या सप्ताहात आज काला व महाप्रसाद आहे. महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तराधिकारी संभाजी महाराज पार पाडत आहेत. यावेळी संत-महंत उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राक्षसभूवन ग्रामस्थांनी केले आहे.
चांगले आचरण, हेच देवपण- हभप इंदुरीकर महाराज
नारायणगड च्या नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात होत आहे. या सप्ताहात वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकार यांनी हजेरी लावली. या कीर्तनातून वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि विचार, समाज एकता येण्यासाठी यातून प्रबोधन करण्यात आले. दरम्यान सहाव्या दिवशी कीर्तन पुष्प गुंफताना विनोदाचार्य प्रबोधनकार कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, दैनंदिन आचरण करताना चांगले वागा, नितीने आचरण करा, हेच देवपण असल्याचे प्रतिपादन हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले. आईवडीलांची सेवा करा, धर्माचे पालन करा, राष्ट्रसेवा करा असे आवाहनही त्यांनी उपस्थित भाविकांना केले.



