अंबाजोगाईत वादळी वारे आणि गारांसह मुसळधार पाउस; वीज कोसळून तरुणाचा मृत्यू
अंबाजोगाई प्रतिनिधी: हवामान विभागाने सूचित केल्यानुसार सोमवारी सायंकाळी अंबाजोगाई शहर आणि तालुक्यात वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरालगत असलेल्या मगरवाडी येथे वीज कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला. सचिन मधुकर मगर (वय 38, रा. मगरवाडी) असे मयत तरुणाचे नाव आहे.
सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसामुळे अंबाजोगाईत शहरातील नाल्या ओसंडून वाहून रस्त्यांवर पाणी साचले. अचानक झालेल्या या हवामान बदलामुळे शहरवासीयांची चांगलीच धांदल उडाली. नागरिक दुकाने, टपऱ्या आणि इतर आडोशांखाली धाव घेताना दिसले. नेहमी प्रमाणेच पाऊस सुरू झाला की शहरातील बहुतांशी भागात वीजपुरवठाही खंडित झाल्याचे वृत्त आहे. गारपिटीमुळे परिसरातील शेतीसही फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदतीचे आश्वासन द्यावे, अशी मागणी होत आहे.