📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

धामणगाव परिसरात विहिरीतील मोटार चोरीचे प्रमाण वाढले; शेतकरी त्रस्त, पोलिस प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

धामणगाव परिसरात विहिरीतील मोटार चोरीचे प्रमाण वाढले; शेतकरी त्रस्त, पोलिस प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप
आष्टी (प्रतिनिधी)
धामणगाव परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विहिरींमधील पाण्याच्या मोटारी चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली असून, या प्रकारामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वस्तीवरील तसेच शेतशिवारातील विहिरी लक्ष्य करून अज्ञात चोरट्यांकडून मोटारी लंपास केल्या जात असल्याने शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.
सध्या पिकांना पाण्याची अत्यंत गरज असताना मोटार चोरीस गेल्यामुळे सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे वाढती महागाई आणि शेतीचा खर्च वाढलेला असताना, पुन्हा नव्याने मोटार खरेदी करणे अनेक शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होत आहेच, पण मानसिक तणावही वाढत आहे.
या गंभीर प्रकाराकडे पोलिस प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी  केला आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, “धामणगाव परिसरात मोटार चोरीचे प्रकार वारंवार घडत असताना पोलिस प्रशासनाकडून अपेक्षित गस्त, तपास किंवा प्रतिबंधात्मक कारवाई होताना दिसत नाही. यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत असून शेतकरी वर्ग असुरक्षिततेच्या भावनेत आहे.”
गाढवे यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, जर तात्काळ या चोरीच्या घटनांचा छडा लावला गेला नाही, तसेच रात्रीची गस्त वाढवली नाही, तर शेतकरी संघटना आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यास मागे-पुढे पाहणार नाही. पोलिस प्रशासनाने तातडीने परिसरात सीसीटीव्ही तपासणी, संशयितांची चौकशी आणि नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, धामणगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी  आपली कैफियत मांडत, “आमच्या विहिरी, मोटारी हाच आमचा आधार आहे. जर हाच आधार चोरीस गेला, तर शेती करायची तरी कशी?” असा सवाल उपस्थित केला आहे.
या वाढत्या चोरीच्या घटनांकडे पोलिस प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, की शेतकऱ्यांना अजून किती दिवस अशाच समस्यांना सामोरे जावे लागणार, याकडे  लक्ष लागून राहिले आहे.
Back to top button