बीड
राक्षसभूवनमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

राक्षसभूवनमध्ये विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू
गेवराई (प्रतिनिधी)- गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन गावात दि. 30रोजी सातच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. ज्ञानेश्वर सुभाष बल्लेवाड (वय ३2) हा तरुण सकाळी झोपेतून उठल्यानंतर नेहमीप्रमाणे रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला. परंतु, रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श होताच त्याला प्रचंड विजेचा धक्का बसला आणि काही क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना इतकी अचानक घडली की ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत बल्लेवाड यांचा मृत्यू झाला होता. एका तरुणाचा अशा प्रकारे झालेला मृत्यू पाहून गावात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. विजेच्या तारांची वेळेवर दुरुस्ती न करणे व दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. गावकऱ्यांनी विजेच्या यंत्रणेकडून या गंभीर निष्काळजीपणाबद्दल जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. हे ज्ञानेश्वर बल्लेवाड अतिशय प्रेमळ व शिस्तप्रिय असल्याने त्यांच्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, मृत ज्ञानेश्वर बल्लेवाड यांच्या पश्चात आई ,बायको ,दोन मुले असे मोठे कुटुंब असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



