📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

उद्योजक भरत गिते यांनी भगवानगडावर घेतले दर्शन

उद्योजक भरत गिते यांनी भगवानगडावर घेतले दर्शन
महंत डॉ.न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराजांची घेतली सदिच्छा भेट
बीड (प्रतिनिधी)
दि.५ : उद्योगविश्वात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आणि ‘ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे ‘तोरल इंडिया ग्रुप’चे संचालक, बीड जिल्ह्याचे सुपुत्र, उद्योजक भरत गिते यांनी शुक्रवारी (दि.४) भगवानगड येथे संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मठाधिपती महंत डॉ.नामदेव शास्त्री महाराज यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान भगवानगडावर साकारल्या जाणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या बांधकामाची माहिती महंत नामदेव शास्त्री महाराजांनी भरत गिते यांना दिली. मंदिराच्या भव्य संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष कामाच्या प्रगतीपर्यंतचा तपशील त्यांनी यावेळी मांडला. भगवानगड ही केवळ अध्यात्माची भूमी नसून शिक्षण, संस्कार आणि सामाजिक परिवर्तनाचे केंद्र म्हणून कार्यरत आहे. गडावर विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, तसेच वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल याविषयीही शास्त्री महाराजांनी माहिती दिली. यावेळी महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्या हस्ते संत भगवानबाबांची प्रतिमा भेट देऊन भरत गिते यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भगवानगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प. कृष्णा महाराज शास्त्री, तोरल इंडिया कंपनीचे व्यवस्थापक निलेश जायभाये, लेट्सअप मराठीचे इंजि. जनार्धन जायभाये, उद्योजक केशव नागरगोजे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
उद्योगाच्या प्रगतीसोबत संस्कारांची नाळ जोडणारी भेट
भगवानगडाच्या पावन भूमीत उद्योगविश्वातील एका यशस्वी व्यक्तिमत्त्वाची झालेली ही भेट आधुनिक उद्योगक्षमता, शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि संतपरंपरा यांचा एक प्रेरणादायी संगम ठरली. उद्योगाच्या उत्तुंग प्रगतीसोबत अध्यात्म आणि मूल्यांची नाळ घट्ट ठेवणारी ही भेट ठरली आहे.
Back to top button