बीड
दिवेआगर येथे संत निरंकारी आध्यात्मिक संत समारोहाचे उत्साहात आयोजन; राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

दिवेआगर येथे संत निरंकारी आध्यात्मिक संत समारोहाचे उत्साहात आयोजन; राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
श्रीवर्धन / दिवेआगर(संदेश घोलप):
माणसाला माणसाशी जोडणारा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणारा ‘संत निरंकारी आध्यात्मिक संत समारोह’ श्रीवर्धन तालुक्यातील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या दिवेआगर येथे अत्यंत दिमाखात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिवेआगर येथील सत्यवान सावित्री पाखाडी गोठणेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्याला तालुक्यातील भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या आध्यात्मिक उपक्रमामुळे संपूर्ण परिसर निरंकारी विचारांच्या आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता.
या पवित्र सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने श्रीवर्धन पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष सभापती मा. श्री. सुचिन किर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. मोहम्मदशेठ मेमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धन तालुकाध्यक्ष मा. श्री. मंदारजी तोडणकर साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली.
उपस्थित मान्यवरांनी संत निरंकारी मंडळाच्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचा गौरव केला. “आजच्या धकाधकीच्या युगात मानवी मनाला शांतता आणि योग्य दिशा देण्याचे कार्य अशा आध्यात्मिक समारोहांच्या माध्यमातून होते,” अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.
पंचक्रोशीतून उसळला भाविकांचा जनसागर
या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यातून झालेली भाविकांची विक्रमी उपस्थिती. दिवेआगर येथील स्थानिक ग्रामस्थांसह श्रीवर्धन शहर, वडवली, बोर्ली, कापोली तसेच भरडखोल या आणि अशा अनेक गावांमधील आबालवृद्धांनी, महिलांनी आणि निरंकारी मिशनच्या अनुयायांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. गावागावातून आलेल्या भाविकांमुळे गोठणेश्वर मंदिर परिसर अक्षरशः ओसंडून वाहत होता.
गोठणेश्वर मंदिराच्या पवित्र प्रांगणात आयोजित या समारोहात सुश्राव्य भजन, कीर्तन आणि आध्यात्मिक विचारांची देवाणघेवाण झाली. उपस्थित संतांनी ‘ईश्वर भक्ती आणि मानव सेवा’ हाच खरा धर्म असल्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या सुयोग्य नियोजनामुळे एवढी मोठी गर्दी असूनही अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. समारोहाच्या सांगतेनंतर उपस्थित सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा अभूतपूर्व सोहळा श्रीवर्धन तालुक्याच्या आध्यात्मिक इतिहासात एक सुवर्णपान ठरला आहे, अशी चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत सुरू आहे.



