📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जावेळे गावात बिबट्याचा थरार! गुरांवर सलग हल्ल्यांचे सत्र; पाळीव प्राण्यांचाही बळी – ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती, वनविभागाकडे तातडीच्या कारवाईची मागणी

जावेळे गावात बिबट्याचा थरार!

गुरांवर सलग हल्ल्यांचे सत्र; पाळीव प्राण्यांचाही बळी – ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती, वनविभागाकडे तातडीच्या कारवाईची मागणी
श्रीवर्धन (संदेश घोलप ) :
श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे गावात गेल्या काही दिवसांपासून हिंस्त्र श्वापद बिबट्याचा वावर वाढल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. विशेषतः बिबट्याच्या हल्ल्यांमुळे पाळीव जनावरांचा बळी जात असल्याने शेतकरी आणि पशुपालक मोठ्या चिंतेत सापडले आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून संध्याकाळनंतर गावात शांतता पसरलेली दिसून येत आहे. नागरिकांनी अनावश्यकपणे घराबाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली असून लहान मुलांनाही बाहेर खेळण्यासाठी पाठवले जात नाही.
या संदर्भात जावेळे येथील शेतकरी विजय महादेव रांगले यांनी श्रीवर्धन वनक्षेत्रपाल अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वनविभागाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन ग्रामस्थांच्या जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ मार्च रोजी विजय रांगले यांनी आपली १२ गुरे नेहमीप्रमाणे जंगल परिसरात चरण्यासाठी सोडली होती. मात्र संध्याकाळच्या सुमारास त्यापैकी दोन गुरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. रांगले यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ त्यांच्या गुरांनाच नव्हे तर गावातील इतर शेतकऱ्यांची मिळून आतापर्यंत गावांमधील सुमारे ६ गुरे या बिबट्याने ठार  केली आहेत.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याचा वावर आता केवळ जंगलापुरता मर्यादित राहिलेला नसून तो लोकवस्तीकडे सरकत आहे. परिसरातील काही भागात बिबट्याने ५ पाळीव कुत्र्यांवरही हल्ला करून त्यांना ठार केले आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती अधिकच वाढली आहे. रात्रीच्या वेळी काही ग्रामस्थांना हा प्राणी प्रत्यक्ष दिसल्याचेही सांगण्यात येत आहे.
जावेळे परिसरातील अनेक नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन आहे. गुरेढोरे हीच त्यांची उपजीविकेची साधने असल्याने या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना रात्री बाहेर न ठेवता सुरक्षित गोठ्यांमध्ये ठेवण्यास सुरुवात केली आहे. तरीही जंगलालगतच्या भागात असलेल्या घरांना धोका कायम असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गावात सध्या प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संध्याकाळनंतर नागरिकांनी घराबाहेर पडणे जवळपास बंद केले आहे. लहान मुलांना बाहेर खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. शेतकरी देखील शेतात काम करताना सतर्क राहू लागले आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी गटागटाने पहारा देण्यास सुरुवात केल्याचेही समोर आले आहे.
विजय रांगले यांनी वनविभागाला दिलेल्या निवेदनात प्रशासनाला थेट सवाल उपस्थित केला आहे की,
“यदाकदाचित बिबट्याच्या हल्ल्यात मानवी जीविताचे बरेवाईट झाले, तर त्यास जबाबदार कोण?”
या प्रश्नामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची चर्चा गावात सुरू आहे.जावेळे परिसरात अनेक ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा स्पष्टपणे दिसून येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाढत्या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीवर वनविभाग नेमकी कोणती पावले उचलतो, याकडे जावेळे गावासह संपूर्ण श्रीवर्धन तालुक्याचे लक्ष लागले आहे
वनविभागाकडे ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या गुरांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक भरपाई देण्यात यावी.
जावेळे गाव व परिसरात वनविभागाने नियमित गस्त वाढवावी.
संबंधित हिंस्त्र प्राण्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्यात यावा.
ग्रामस्थांना सुरक्षिततेबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यात यावे.
Back to top button