कोरोना अपडेटमहाराष्ट्रराजकीय

दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहिमेचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीत शुभारंभ

बीड जिल्ह्याचा ‘स्पेशल डे’ पॅटर्न राज्यभरात राबविण्याचा मानस – ना. मुंडे

परळी —- : सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर एक दिवस राखीव ठेवत दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली असून, या मोहिमेचा परळीतील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथील लसीकरण केंद्रावर ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्रावर ये-जा करणे, यासह अन्य अडचणींचा विचार करून सामाजिक न्याय विभागाने दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केला होत्या. त्यानुसार एक दिवस फक्त दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणा साठी राखीव ठेऊन प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्याच्या या विशेष मोहिमेची बीड जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्याचा आपला मानस आहे, असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

यावेळी न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, रा.यु. कॉ.चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे, सुंदर गित्ते, सूर्यभान मुंडे, प.स. सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, सय्यद सिराज, शरद कावरे, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, नायब तहसीलदार श्री रुपनर यांसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान आज (दि. 05) रोजी बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली असून, या मोहिमेला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला असून, सायंकाळी 4 वाजेपर्यंत 1000 पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Back to top button