📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मराठा समाजातील महिलांचा अपमान करणाऱ्या वक्तव्याविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

मराठा समाजातील महिलांचा अपमान करणाऱ्या वक्तव्याविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

नवनाथ वाघमारे यांच्यावर कारवाई करून तातडीने अटक करण्याची महिलांची मागणी

बीड : मराठा समाज आणि विशेषतः मराठा समाजातील महिला व मुलींबाबत नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मराठा समाजातील महिलांनी गुरुवारी बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. यावेळी महिलांच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन संबंधित वक्तव्याची गांभीर्याने दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिला व मुलींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे समाजातील महिलांच्या भावना दुखावल्या असून, या वक्तव्यातून एका विशिष्ट समाजातील महिलांची टिंगल-टवाळकी व अवमान केल्याचे दिसून येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये गैरसमज, तेढ आणि असंतोष निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याचेही महिलांनी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

मराठा समाजातील महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा अबाधित राहणे हा संवेदनशील विषय असून, कोणत्याही समाजातील महिला किंवा मुलींबाबत अवमानकारक वक्तव्य करणे योग्य नसल्याचे महिलांनी स्पष्ट केले. संबंधित वक्तव्याची चौकशी करून त्यामागील हेतू तपासावा तसेच कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन नवनाथ वाघमारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी मराठा समाजातील महिलांनी केली आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही महिलांनी व्यक्त केली.

“महिलांचा सन्मान हा कोणत्याही समाजाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. कोणत्याही समाजातील महिलांचा अवमान करणारी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत,” अशी भूमिका यावेळी उपस्थित महिलांनी मांडली.

Back to top button