📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

कोल्हापुरात ना. पंकजाताई मुंडे यांचं उत्स्फूर्त स्वागत

कोल्हापुरात ना. पंकजाताई मुंडे यांचं उत्स्फूर्त स्वागत

*कणेरी मठाच्या श्री सिध्दगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे थाटात लोकार्पण*

*पशुपालकांचे कल्याण हाच पशुवैद्यकीय शिक्षणाचा केंद्रबिंदू असावा ; विद्यार्थ्यांनी नोकरीपेक्षा उद्योजकतेला प्राधान्य देण्याचे केले आवाहन*

कोल्हापूर दि. ०३ —
पशुवैद्यकीय विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाचा थेट उपयोग पशुपालकांच्या जीवनमानात व उत्पन्नात वाढ करण्यासाठी झाला पाहिजे. पशुधनाचे आरोग्य, उत्पादकता आणि व्यवस्थापन सुधारल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे पशुवैद्यकीय महाविद्यालये केवळ पदवी देणाऱ्या संस्था न राहता पशुपालकांच्या समस्या सोडविणारे ज्ञान व तंत्रज्ञान केंद्र झाले पाहिजे अशी अपेक्षा राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज येथे व्यक्त केली.

कणेरी येथील श्री सिध्दगिरी मठाच्या श्री सिद्धगिरी पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाचे लोकार्पण आज ना. पंकजाताई  मुंडे  यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोजित पशुपालक मेळाव्यास त्यांनी संबोधित केले. मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

याप्रसंगी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, पशुपालकांच्या दारापर्यंत आधुनिक पशुवैद्यकीय सेवा आणि तंत्रज्ञान पोहोचणे ही आजची गरज आहे.” पशुधनातील आजारांचे वेळेवर निदान, प्रतिबंधात्मक लसीकरण, संतुलित पशुआहार, प्रजनन व्यवस्थापन आणि आधुनिक पशुपालन पद्धतींचा अवलंब यामुळे पशुपालकांच्या उत्पादन खर्चात बचत आणि उत्पन्नात वाढ होऊ शकते. पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील प्रत्यक्ष समस्या समजून घेऊन त्यावर स्थानिक पातळीवर व्यवहार्य उपाय विकसित करण्यासाठी संशोधन करावे. पदवी मिळाल्यानंतर केवळ शासकीय किंवा खासगी नोकरीच्या संधींच्या मागे न लागता स्वतः रोजगार निर्माण करणारे पशुवैद्यकीय उद्योजक घडणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आधुनिक पशुवैद्यकीय क्लिनिक, निदान केंद्रे, मोबाईल पशुवैद्यकीय सेवा, डेअरी फार्म व्यवस्थापन, पशुखाद्य व पोषण सल्ला, प्रजनन सेवा, पशुधन विमा, डिजिटल सल्ला सेवा आणि दुग्धजन्य पदार्थांचे मूल्यवर्धन या क्षेत्रांत तरुण पशुवैद्यकांसाठी मोठ्या संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण युवकांसोबतच महिलांना पशुपालन व दुग्धव्यवसायातील निर्णयप्रक्रियेत आणि आर्थिक उपक्रमांमध्ये अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास पशुविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, आ. अमल महाडिक, अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये, जि.प. अध्यक्ष प्रियाताई  शिंदे, डॉ. के. एम. एल. पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

*एसटीपी प्रकल्पाला भेट*
——
या दौऱ्यात ना. पंकजाताई मुंडे यांनी कसबा बावडा येथील घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्राला (STP) भेट देऊन पाहणी केली व कामाचा आढावा घेतला.
​पर्यावरण संरक्षण, नदी प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकासासाठी सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया होणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रकल्पाची कार्यक्षमता अधिक सुधारण्यासाठी तसेच परिसरातील स्वच्छता व आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

*जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा*
———-
ना. पंकजाताई मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना, प्रकल्प आणि उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा बैठक घेतली.​नदी प्रदूषण नियंत्रण, सांडपाणी व्यवस्थापन, पर्यावरणपूरक विकास आणि पशुधन संवर्धनासाठी आखलेल्या योजनांची गती वाढवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश या वेळी संबंधित यंत्रणांना दिले. ​याप्रसंगी खा.धनंजय महाडिक, आ.अमल महाडिक, आ.राहुल आवाडे, आ.अशोक माने, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Back to top button