बीड
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन; वडवणी शहर कडकडीत बंद

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन; वडवणी शहर कडकडीत बंद
वडवणी: प्रतिनिधी सकल मराठा समाजाच्या आवाहनाला व्यापारी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सहकार्याबद्दल मानले आभार
संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन व साथ देण्यासाठी सकल मराठा समाज, वडवणी तालुक्याच्या वतीने वडवणी शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला शहरातील व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे वडवणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला होता. शहरातील व्यापारी, दुकानदार तसेच विविध समाजबांधवांनी एकजुटीने सहभागी होत बंद यशस्वी केला.
यावेळी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. “मनोज दादा जरांगे पाटील यांच्या संघर्षाला आमचा पूर्ण पाठिंबा असून, समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहावे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.
वडवणी शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील सर्व व्यापारी बांधव, दुकानदार व सर्व समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करण्यात आले.



