सेवानिवृत्त मुख्याध्यापक शशिकांत निकाळजे गुरुजी यांचे निधन; उद्या अंत्यविधी

सेवानिवृत्त मुख्याध्यापक शशिकांत निकाळजे गुरुजी यांचे निधन; उद्या अंत्यविधी
जामखेड (प्रतिनिधी) —
शाळेच्या वर्गात पहिल्यांदा अक्षरांची ओळख करून देणारे,शिस्त आणि संस्कारांची शिकवण देणारे शिक्षक आयुष्यभर मनात घर करून राहतात. अशीच एक हळवी आठवण आज जामखेडकरांच्या मनात दाटून आली आहे. येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक शशिकांत दगडू निकाळजे (गुरुजी) यांचे आज दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने वयाच्या ८० वर्षी दुःखद निधन झाले.उद्या दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वाजता बीड शहरातील अंकुशनगर स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती त्यांचे चिरंजीव अश्विनकुमार शशिकांत निकाळजे यांनी दिली.
जामखेड शहरातील सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व असलेले निकाळजे गुरुजी हे कर्जत-जामखेडचे माजी आमदार द.स.निकाळजे गुरुजी यांचे चिरंजीव होते.शिक्षक म्हणून त्यांनी अनेक पिढ्यांना घडविले. सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला.
परखड विचार, मनमिळावू स्वभाव आणि सर्वांमध्ये आपुलकीने मिसळून राहण्याच्या त्यांच्या गुणामुळे जामखेड शहरात त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांसाठी ते केवळ शिक्षक नव्हते, तर मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते.त्यांच्या जाण्याने निकाळजे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विविध स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी, सून, जावई, दोन नाती असा परिवार आहे.



