बीड

लिंबागणेश येथे अतिवृष्टी अनुदानाच्या ई-केवायसीचा सखोल आढावा

लिंबागणेश येथे अतिवृष्टी अनुदानाच्या ई-केवायसीचा सखोल आढावा
सेवा केंद्र चालकांना प्रलंबित ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याच्या सक्त सूचना
लिंबागणेश (दि. १४):
महाराष्ट्र राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनामार्फत आर्थिक मदत म्हणून अनुदान मंजूर करण्यात आले आहे. हे अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असून, यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य आहे. मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित असल्याने त्यांचे अनुदान शासनाकडेच अडकून पडले आहे.
या पार्श्वभूमीवर दि. १४ डिसेंबर रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी उज्वला राऊत यांनी प्रत्यक्ष गावात भेट देत अतिवृष्टी अनुदानाच्या ई-केवायसी प्रक्रियेचा सखोल आढावा घेतला.
यावेळी तलाठी गणपत पोतदार, राजेंद्र शेलकर, तलाठी अक्षय शिंदे, तलाठी नारायण दराडे, महसूल सेवक, पत्रकार हरिओम क्षीरसागर तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे उपस्थित होते.
मंडळ अधिकारी उज्वला राऊत यांनी लिंबागणेश येथील सर्व शासकीय व खासगी सेवा केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन केंद्र चालकांशी संवाद साधला. अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे अनुदान वेळेत मिळावे, यासाठी प्रलंबित सर्व ई-केवायसी तातडीने पूर्ण करून शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याच्या सक्त सूचना त्यांनी सेवा केंद्र चालकांना दिल्या.
> “एका शेतकऱ्याचेही अनुदान ई-केवायसीअभावी रखडता कामा नये. केंद्र चालकांनी कामात तातडीने गती आणावी, अन्यथा संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशाराही यावेळी मंडळ अधिकारी उज्वला राऊत यांनी दिला.
अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हे अनुदान अत्यंत महत्त्वाचे असून अनेक शेतकरी या मदतीवर पुढील हंगामाची तयारी अवलंबून असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. मात्र ई-केवायसीसारख्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर बाब यावेळी समोर आली.
या प्रशासनिक हालचालीमुळे लिंबागणेश परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच प्रलंबित ई-केवायसी पूर्ण होऊन अनुदान थेट खात्यावर जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं. ८१८०९२७५७२
Back to top button