बीड
मराठा-कुणबी प्रमाणपत्राचे विशेष शिबिर नायगाव किंवा निरगुडी येथे घ्यावे

मराठा-कुणबी प्रमाणपत्राचे विशेष शिबिर नायगाव किंवा निरगुडी येथे घ्यावे
ॲड. प्रकाश विठ्ठलराव कवठेकर यांची तहसीलदारांकडे मागणी
पाटोदा : मराठा-कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आयोजित करण्यात आलेले विशेष शिबिर थेरला येथे न घेता नायगाव अथवा निरगुडी येथे आयोजित करण्यात यावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. प्रकाश विठ्ठलराव कवठेकर यांनी मा. तहसीलदार, पाटोदा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी पात्र नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रमाणपत्राची प्रक्रिया सुलभतेने पूर्ण करता यावी, यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र सदर शिबिराचे ठिकाण थेरला येथे निश्चित करण्यात आल्याचे समजते.
थेरला ऐवजी नायगाव किंवा निरगुडी येथे शिबिर आयोजित केल्यास नायगाव, निरगुडी तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळू शकतो. नागरिकांचा प्रवासाचा वेळ व खर्च वाचून प्रमाणपत्राची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल.
नागरिकांची सोय व हित लक्षात घेऊन प्रशासनाने शिबिराच्या ठिकाणाचा फेरविचार करून नायगाव अथवा निरगुडी येथे विशेष शिबिर आयोजित करावे, अशी मागणी ॲड. प्रकाश विठ्ठलराव कवठेकर यांनी केली आहे. प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.



