रत्नागिरी

आंदोलनकर्त्या वैभवी पाटणे यांच्या प्रकरणावरून खेड तहसीलदारांचा मुजोरपणा; वंचितच्या जिल्हाध्यक्षांबरोबर थेट तहसीलदारांनी घातली हुज्जत

आंदोलनकर्त्या वैभवी पाटणे यांच्या प्रकरणावरून खेड तहसीलदारांचा मुजोरपणा; वंचितच्या जिल्हाध्यक्षांबरोबर थेट तहसीलदारांनी घातली हुज्जत

खेड

तालुक्यातील मिर्ले गावातील आंदोलनकर्त्या वैभवी पाटणे ह्या गेल्या 36 दिवसांपासून खेड तहसीलदार यांच्या आवारात ठिय्या आंदोलन करीत आहे. या संदर्भात खेड तहसीलदार सुधीर सोनवणे यांची भेट घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव, महासचिव नितीन जाधव, यांच्यासह इतर कार्यकर्ते दिनांक २२ एप्रिल २०२५, रोजी दुपारच्या सुमारास गेले होते. यावेळी तहसीलदार सोनवणे यांनी त्यांच्याशी तावातावाने बोलत शाब्दिक वाद करून स्वतःच कार्यालयातून बाहेर पडत गाडीत बसून निघून गेले. या प्रकाराची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे.

मिर्ले गावात होणाऱ्या बेकायदेशीर कामाबाबत वैभवी पाटणे ह्या महिला सामाजिक कार्यकर्त्या लढा देत आहेत. मात्र तालुका प्रशासनाकडून त्यांचे सुरू असलेले आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. वैभवी पाटणे यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाला लेखी पत्र लिहित न्याय द्यावा अशी विनंती केली होती. या अनुषंगाने आंदोलनकर्त्या वैभवी पाटणे यांच्या आंदोलनातील एका पत्राबाबत जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी खेड तहसीलदार सोनवणे यांना विचारणा करताच ते चांगलेच संतापले. मात्र अण्णा जाधव यांची मागणी ऐकून न घेताच तावातावाने हा मुद्दा माझा नाही, तुम्ही कोर्टात जावा….मी काही करू शकत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा…मला फरक पडत नाही…. तुम्ही स्वतःला काय समजता… मी तुमचा नोकर नाही…अशी बेजबाबदार वक्तव्य करत तहसीलदार सोनवणे केबिनमधून बाहेर पडून गाडीत बसून निघून गेले. या प्रकरणात खेडचे तहसिलदार वादात सापडण्याची शक्यता आहे. तसेच प्रशासन आंदोलनकर्त्याशी कशापद्धतीने वागत असेल याची देखील कल्पना येऊन जाते.

तहसिलदार केबिनमध्ये संवाद साधत असताना थेट तहसीलदार यांनी शाब्दिक वाद घालत हुज्जत घातल्यानंतर अण्णा जाधव यांनी देखील आपल्या शैलीत तहसीलदार यांना खडेबोल सुनावले. अण्णा जाधव यांनी यापूर्वी ही आक्रमक आंदोलने केली आहेत. परंतु तहसीलदार सोनवणे यांनी भेट घेण्यासाठी गेलेल्या उत्तर जिल्हाध्यक्ष यांच्याशीच थेट हुज्जत घातल्याने पुन्हा एकदा वैभवी पाटणे यांचे सुरु असलेले आंदोलन चर्चेत येणार आहे. मुजोर खेड तहसीलदारांबाबत जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव हे आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

Back to top button