संपादकीय

कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूल सुरु करण्याच्या हालचाली

 

कल्याण | भाजपचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीत विकासकामांचा धडाका लावत शिवसेनेने येत्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मोठागाव खाडीवरील माणकोली पूल खुला करण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. ठाणे-डोंबिवली यांच्यातील अंतर कमी करणाऱ्या या पुलामुळे कल्याण-शिळ रस्त्यावरील कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन या पुलाची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत असे स्पष्ट आदेश मुंबई महानगर विकास प्राधिकरणास देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका तसेच अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. याच मतदारसंघाचा भाग असलेल्या कळवा-मुंब्रा तसेच दिवा या ठाणे महापालिका हद्दीत मोडणाऱ्या परिसरातही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे खासदार शिंदे यांच्यासाठी या निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत.

ठाणे महापालिका हद्दीतील भाजपच्या तुलनेत शिवसेनेची ताकद बरीच मोठी आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मात्र शिवसेनेपुढे यंदा भाजपचे तोडीस तोड आव्हान आहे. डोंबिवली आणि कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर कल्याण ग्रामीण मतदारसंघात महाराष्ट्र नवनिमाण सेनेचे राजू पाटील निवडून आले आहेत. हे लक्षात घेता शिवसेनेने ही निवडणूक आतापासूनच गांभीर्याने घेतली असून वेगवेगळय़ा विकासकामांच्या माध्यमातून पक्षासाठी पोषक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

Back to top button