बीड

उपमुख्यमंत्री अजित(दादा)पवार यांच्या निधनाने जामखेड तालुक्यात शोककळा : शहर कडकडीत बंद

उपमुख्यमंत्री अजित(दादा)पवार यांच्या निधनाने जामखेड तालुक्यात शोककळा : शहर कडकडीत बंद

जामखेड प्रतिनिधी :
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित (दादा) पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. या धक्कादायक बातमीमुळे जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतः शहरातील रस्त्यावर उतरुन जामखेड शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या बंदला व्यापार्‍यांनी व नागरिकांनी प्रतिसाद दिला. सकाळपासून जामखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.
एक कार्यक्षम प्रशासक आणि परखड व्यक्तीमत्व, राजकारणातील धुरंधर नेता हरपला, अशा भावना जामखेड तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत. अजित (दादा ) पवार यांच्या निधनाची बातमी समजताच जामखेड शहरातील सर्व राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी खर्डा चौक याठिकाणी जमा होत हळहळ व्यक्त केली. यानंतर एक दिवसाचा दुखवटा म्हणून शहरातील व्यापारी व नागरिकांना आपली दुकाने बंद ठेवण्याची विनंती कार्यकर्त्यांनी केली होती.
या विनंतीला मान देऊन व्यापार्‍यांनी सहकार्य करित आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते. जामखेड शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा आणि व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले. त्यामुळे जामखेड शहरात सध्या अनेक सार्वजनिक ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
अजित पवार हे त्यांच्या शिस्तीसाठी आणि कामाच्या धडाक्यासाठी ओळखले जात होते. पहाटेपासून कामाला सुरुवात करणारा हा लोकनेता अशा प्रकारे काळाच्या पडद्याआड गेल्याने प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
अजितदादांचे जाणे हा केवळ एका पक्षाचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा मोठा तोटा असल्याच्या भावना सुनिल जगताप, प्रा.लक्ष्मण ढेपे, शहाजी राळेभात, युवक काँग्रेसचे राहुल उगले, प्रवक्ते कैलास हजारे, इस्माईल सय्यद,विनायक राऊत आदींनी व्यक्त केल्या. त्यांच्या निधनाने राज्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ निखळल्याच्या भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत.
या बंद दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शहाजी राळेभात,विकास राळेभात,नगरसेवक राजेंद्र गोरे,अवधूत पवार, नगरसेवक वसिम सय्यद,अभय शिंगवी,हरीभाऊ आजबे, गणेश हगवणे, बाळासाहेब खैरे, संदिप गायकवाड, सुनिल कोठारी,चिराग आजबे,जावेद कुरेशी आदींसह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

Back to top button