📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर साखरा येथे  यशस्वीरीत्या संपन्न

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर साखरा येथे  यशस्वीरीत्या संपन्न
बाभळगाव : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, ग्रामपंचायत साखरा आणि दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगाव  द्वारा संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवक शिबिर सांगता समारंभ मौजे साखरा ता. जि. लातूर येथे संपन्न झाला.  या समारंभाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगाव  उपाध्यक्ष नरसिंह देशमुख  होते तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सदस्य भीमराव शिंदे, डॉ. दशरथ भिसे, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, मुख्याध्यापक स्वामी मॅडम, गायकवाड गुरुजी यांची उपस्थिती होती.
          प्रमुख मार्गदर्शन करताना डॉ. दशरथ भिसे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. युवकांनी समाजाशी जोडलेले राहून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सेवा, शिस्त आणि समर्पण या मूल्यांचा अंगीकार केल्यास विद्यार्थी खऱ्या अर्थाने जबाबदार नागरिक घडू शकतात, असे प्रतिपादन केले.
         प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे म्हणाले,”  विशेष शिबिराच्या यशस्वी आयोजनात गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. निवास, भोजन तसेच उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी गावकऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. गाव व महाविद्यालय यांच्यातील हा सुसंवाद भविष्यातही अधिक दृढ व्हावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त  करतो.”
          प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. सुरेशकुमार कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. माना गायकवाड यांनी केले. स्वयंसेवकाच्या वतीने ओंकार सुरवसे यांनी स्वच्छता मोहीम, जनजागृती फेऱ्या, वृक्षारोपण, आरोग्यविषयक जनजागृती तसेच सामाजिक एकोपा वाढविणाऱ्या उपक्रमांचा उल्लेख विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात केला. “या शिबिरामुळे समाजाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक झाली,” असे मत व्यक्त केले.
         कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. नरेंद्र देशमुख यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. जयदेवी पवार, डॉ. वैशाली माढेकर, प्रा. शितल खोत, डॉ.शाहुराज मुळे, डॉ. नाना जाधव इतर प्राध्यापक, स्वयंसेवक, विद्यार्थी, साखरा येथील ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
Back to top button