बीड

राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत नांदूर हवेली येथील पूरग्रस्तांना किराणा साहित्याचे वाटप

राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत नांदूर हवेली येथील पूरग्रस्तांना किराणा साहित्याचे वाटप

बीड प्रतिनिधी दिनांक: 6 नोव्हेंबर 2025, रोजी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विविध महाविद्यालयांच्या स्वयंसेवकांनी संकलित केलेले किराणा साहित्य व दैनंदिन वापरातील अत्यावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप नांदूर हवेली (ता. बीड) येथील पूरग्रस्त कुटुंबांना करण्यात आले. या उपक्रमामध्ये श्री बंकटस्वामी महाविद्यालय बीड, स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड, मिलीया महाविद्यालय बीड, महिला महाविद्यालय बीड तसेच जय भवानी कला व विज्ञान महाविद्यालय पाटोदा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवकांनी या अभियानासाठी योगदान दिले.
पूरग्रस्त भागातील परिस्थितीचे सर्वेक्षण करून प्रत्यक्षात ज्या कुटुंबांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे, अशा 45 कुटुंबांची निवड करून त्यांना किराणा साहित्याचे किट देण्यात आले.
या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. सोमीनाथ खाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी ग्रामस्थांना राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. आपत्तीच्या प्रत्येक प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना ही समाजाच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते. समाजात राष्ट्रीय एकात्मता, बंधुता व राष्ट्रप्रेम रुजविण्याचे कार्य निःस्वार्थ भावनेतून केले जाते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
श्री बंकटस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धांडे यांनी विद्यार्थी व दानशूर व्यक्तींच्या मदतीतून हे साहित्य संकलित करण्यात आले असून, समाजापर्यंत पोहोचविणे हे आमचे कर्तव्य आहे. ही मदत छोटी असो वा मोठी, ती मानवतेची भावना पोहोचवणारी आहे, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना बीड जिल्हा समन्वयक डॉ.अरुण दैतकार तसेच श्री बंकटस्वामी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. मनोजकुमार नवसे,डॉ.शंकर शिवशेट्टे, प्रा.राजाभाऊ नागरगोजे, डॉ.सुनील त्रिभुवन, डॉ.जगन्नाथ चव्हाण तसेच हिंगणी ग्रामपंचायतीचे सदस्य श्री.शिवनाथ बुधनर, सामाजिक कार्यकर्ते शेख अयुब, श्री प्रेमनाथ धांडे व हिरापूर येथील श्री विलास साहेबराव वडमारे उपस्थित होते.राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी सुरज गायकवाड व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.शेवटी पूरग्रस्त कुटुंबांना किटचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पूरग्रस्त नागरिकांनी आभार व्यक्त केले आम्हालाही छोटी का होईना मदत मिळाली आमची दखल घेतली त्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मनस्वी आभार व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे काही निवडक स्वयंसेवक तसेच हिंगणी व हिरापूर गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button