📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आ. संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यश

आ. संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यश
बीड एसटी आगाराच्या ताफ्यात ५ अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल
बीड दि.११ (प्रतिनिधी): बीड मतदारसंघातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि एसटीचा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला श यश आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने बीड आगारासाठी अत्यंत आधुनिक आणि हाय-टेक अशा ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस मंजूर करण्यात आल्या असून, त्या बसेस बीड आगारात दाखल झाल्या आहेत. अधिक आसन क्षमता आणि कडक सुरक्षा यंत्रणा असलेल्या या नव्या बसेसमुळे जिल्ह्यातील प्रवासी वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे.
बीड जिल्ह्यातील मुख्य आणि ग्रामीण मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अनेकदा बसमध्ये जागा न मिळाल्याने प्रवाशांना उभे राहून किंवा ताटकळत प्रवास करावा लागत होता. प्रवाशांची हीच अडचण ओळखून आमदार संदीप क्षीरसागर यांनी परिवहन मंत्रालयाकडे बीड आगाराला नवीन बसेस देण्याबाबत सातत्याने मागणी केली होती. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून ५ नव्या दमाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस बीडकरांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. त्यामुळे गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना  मोठा दिलासा मिळणार आहे.
‘राजमाता जिजाऊ’ बसेसमध्ये अत्याधुनिक ३ बाय २ ची आसन रचना करण्यात आलेली आहे. यामुळे बसची एकूण क्षमता ५५ ते ५६ आसनांची झाली असून, नेहमीच्या बसपेक्षा यामध्ये १५ ते १६ आसने जास्त आहेत. परिणामी, प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागणार नाही. तसेच प्रवाशांच्या आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी बसच्या आत आणि बाहेर ४ हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत व बसमध्ये रिअल-टाईम ट्रॅकिंगसाठी जीपीएस (GPS) यंत्रणा आणि पुढील स्थानकाची माहिती देणारा इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक (स्मार्ट डॅशबोर्ड) लावण्यात आलेला आहे. त्यासोबतच प्रवासात कोणतीही आणीबाणीची परिस्थिती किंवा दुर्घटना घडल्यास प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘पॅनिक बटण’ आणि अलार्म सिस्टीम देण्यात आली असून प्रवाशांना आवश्यक सूचना देण्यासाठी बसमध्ये अनाउन्समेंट सिस्टीमची विशेष सोय आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा सन्मान राखत या बसेस आकर्षक भगव्या आणि पांढऱ्या रंगात डिझाइन करण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान महाराष्ट्राच्या आराध्य परंपरेचे प्रतीक असलेल्या आणि हाय-टेक तंत्रज्ञानाने सज्ज ‘राजमाता जिजाऊ’ बसेस बीड आगारात दाखल होताच एसटी कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. सर्वसामान्यांच्या हक्काची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास थकवामुक्त करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल असल्याने आ.संदीप क्षीरसागर यांचे सर्वसामान्य जनतेतून आभार मानले जात आहेत.

Back to top button