📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

श्रीनाथ गीतेची आत्महत्या; शैक्षणिक क्षेत्रातील परिस्थिती चीड आणणारी व उद्विग्न करणारी!

श्रीनाथ गीतेची आत्महत्या; शैक्षणिक क्षेत्रातील परिस्थिती चीड आणणारी व उद्विग्न करणारी!

महाराष्ट्रातील आश्रमशाळा, अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा  संस्थाचालकांच्या मनमानी कारभार, आर्थिक गैरव्यवहार आणि कर्मचाऱ्यांवरील दडपशाहीविरुद्ध तात्काळ कार्यवाही करावी.

मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन.

बीड  दिनांक 24 ऑगस्ट: दोन संस्थाचालकांच्या जाचास कंटाळून श्रीनाथ गीते या तरूण आश्रमशाळा कर्मचाऱ्याची आत्महत्या अतिशय दुःखद आहे. शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती चीड आणणारी व उद्विग्न करणारी असून महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या आश्रमशाळा तसेच अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा  संस्थाचालकांच्या मनमानी कारभार, आर्थिक गैरव्यवहार आणि कर्मचाऱ्यांवरील दडपशाहीविरुद्ध तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने केली आहे.
मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील अनेक विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा,तसेच अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा  संस्थाचालकांकडून आर्थिक गैरव्यवहार, मनमानी कारभार, कर्मचाऱ्यांवरील अन्यायकारक दडपशाही आणि शासननिधीचा अपहार मोठ्या प्रमाणावर होत आहे. या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या असून त्याचा थेट परिणाम शिक्षक–कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. परिणामी शिक्षणाचा दर्जा खालावत असून विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत प्रत्येक नागरिकास सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र अशा शाळांमधील संस्थाचालकांच्या दहशतीमुळे व अन्यायकारक कारभारामुळे हा अधिकार मोडीत निघत आहे. शासनाकडून समस्यांचे निराकरण करण्याऐवजी कर्मचारी नियमांच्या कचाट्यात अडकवले जात आहेत, जे संविधानाच्या कलम १४ अंतर्गत समानतेच्या तत्त्वालाही बाधक आहे.
नुकतेच मा. विमुक्त जाती–भटक्या जमाती राज्य समितीने सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळांवर केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये शासननिधीवरील मोठ्या प्रमाणातील गैरव्यवहार उघड झाला आहे. हे प्रकरण संविधानाच्या कलम ४६ अंतर्गत दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधांच्या संवर्धनाच्या निर्देशक तत्त्वांचे स्पष्ट उल्लंघन आहे.
या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तरुण श्रीनाथ गीते याची आत्महत्या ही घटना राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांच्या संघर्षाचं प्रतीक आहे. अनुकंपा नियुक्तीसाठी अनेक वर्षांपासून शासन व संस्थाचालकांच्या दारात धावपळ करूनही त्याला रुजू करून घेतले नाही. आईच्या कर्करोगाशी चाललेला संघर्ष, आर्थिक विवंचना आणि संस्थाचालकांच्या दडपशाहीमुळे अखेर त्याने आत्महत्या केली. ही शोकांतिका संविधानाच्या कलम २१ अंतर्गत जीवनाच्या अधिकाराचे गंभीर उल्लंघन आहे तसेच कलम ३९ (अ) मधील सामाजिक न्यायाच्या तत्त्वालाही बाधक आहे. त्यामुळे नियमांची पायमल्ली करणाऱ्या संबंधित संस्थाचालकांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत व त्यांची परवानगी/मान्यता रद्द करण्यात यावी.
अशा शाळा आश्रमशाळांमध्ये शासननियुक्त प्रशासक नेमून शाळा कार्यान्वित ठेवाव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये.
राज्यातील सर्व वादग्रस्त शाळांची सखोल चौकशी करून अहवाल जाहीर करावा व दोषींवर कठोर कार्यवाही करावी. कर्मचाऱ्यांना गुलामासारखे वागवणाऱ्या मुजोर संस्थाचालकांची “गुंडाराज पद्धती” तातडीने संपुष्टात आणली जावी. सर्व अनुकंपा नियुक्त्यांसाठी वेळबद्ध प्रक्रिया आखून तिची काटेकोर अंमलबजावणी करावी. पीडित कर्मचाऱ्यांना तात्काळ संरक्षण, न्याय आणि मानसिक आधार उपलब्ध करून द्यावा. कोणत्याही महासत्तेचा मार्ग दर्जेदार शिक्षण व्यवस्थे मधूनच जातो. त्यामुळे श्रीनाथ गीतेंच्या आत्महत्येस जबाबदार असणारांवर कडक कारवाई करावी, शिक्षण व्यवस्थेतील अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम,  उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, कोषाध्यक्ष ए. बी. औताडे,माजी जिल्हाध्यक्ष डी.जी.तांदळे, जिल्हाध्यक्ष कालिदास धपाटे, जिल्हा सचिव गणेश आजबे , केंद्र कार्यकारिणी सदस्य बंडू आघाव, अशोक मस्कले, नामदेव काळे, सुभाष शेवाळे, विजय गणगे, परवेज देशमुख, व्यंकटराव धायगुडे, हनुमंत घाडगे, गोवर्धन सानप, मनोज सातपुते, तावरे डी. एम, दिनकर शिंदे, युवराज मुरूमकर, विनोद सवासे, अनुप कुसुमकर, श्रीधर गुट्टे, सुमंत गायकवाड, विष्णू वळेकर, प्रदीप चव्हाण, हेमंत धानोरकर, शेख आय. जे, एम.डी. डोळे, अशोक अशोक गाडेकर,  शिवाजी ढोबळे, जीवनराव थोरात, बाळासाहेब टिंगरे, दादासाहेब घुमरे, बाळासाहेब काळुशे, शामसुंदर साळुंके, सुनिल जाधव, श्रीनिवास काकडे,  हनुमंत गवारे, तुळशीदास सोळंके, जगदिश्चंद्र प्रेमचंद तोष्णीवाल, नदीम युसूफ, पुरुषोत्तम येडे पाटील, संजय गोरे, अलिशान काझी, सुनिल नागरगोजे, बी. टी. खाडे यांनी दिला आहे यांनी दिला आहे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Back to top button