📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बीड जिल्हधिकारी कार्यालयावर पाण्यासह हक्काच्या प्रश्नावर निघणाऱ्या दि 29 रोजी च्या बैलगाडी मोर्चाला शेकापचा पाठींबा

बीड जिल्हधिकारी कार्यालयावर पाण्यासह हक्काच्या प्रश्नावर निघणाऱ्या दि 29 रोजी च्या बैलगाडी मोर्चाला शेकापचा पाठींबा

शेकापचे भाई मोहन गुंड आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देणार, शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आव्हान
बीड जिल्हा प्रतिनिधी
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. “पाणी आपल्या हक्काचं… नाही कोणाच्या बापाचं” या जोरदार घोषणेने लोकलढा आंदोलन, बीडच्या वतीने येत्या 29 मे 2026, शुक्रवारी सकाळी 10 वाजता भव्य ‘बैलगाडी मोर्चा’ काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा लढा शेतकऱ्यांनाच लढावा लागणार आहे या मोर्चाला शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड सहभागी होणार असून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
बीड शहरातील सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स ते जिल्हाधिकारी कार्यालय, बीड या मार्गावर हा मोर्चा निघणार असून, जायकवाडी धरणातील हक्काच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाला धारेवर धरण्यात येणार आहे.
*पाण्याविना शेती, शेतीविना रोजगार*
“पाण्याविना शेती गेली, शेतीविना रोजगार गेला, रोजगाराविना प्रगती गेली आणि प्रगतीविना संसार उध्वस्त झाले. हे सर्व अरिष्ट शेतीला हक्काचे पाणी नसल्याने झाले आहे,
*प्रमुख मागण्या काय?*
लोकलढा आंदोलनाने या मोर्चाच्या माध्यमातून सहा प्रमुख मागण्या
1) कोकणातील 168 TMC पाणी नदीजोड प्रकल्पातून नियोजित वेळेत जायकवाडी धरणात आणून बीड जिल्ह्यातील शेतीला द्यावे. 2) गोदावरी-सिंदफणा नदीजोड प्रकल्प व उपकालव्याचा तातडीने सर्वे करावा. 3) कोकणातून येणाऱ्या 168 TMC पाण्यात बीड जिल्ह्याच्या वाट्याला किती पाणी येणार, याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तात्काळ तयार करावा. 4) गेवराई तालुक्यातील उजवा कालवा व माजलगाव धरणाला जायकवाडीतून मिळणारे पाणी कमी केले आहे, ते पूर्ववत करावे 5.) बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीचा पीकविमा तातडीने द्यावा 6) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी.
मराठवाड्याच्या तहानेवर वर्षानुवर्षे राजकारण झाले. आता शेतकरी जागा झाला आहे. आपला लढा आपल्यालाच लढावा लागेल,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे. बैलगाडी, ट्रॅक्टर, नांगर घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. या मोर्चात जिल्हाभरातून शेकापचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत अशी माहिती जिल्हा चिटणीस ॲड नारायण गोले पाटील, भाई बापूसाहेब सोळुंके यांनी दिली आहे , प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा लोकलढा आंदोलनाच्या आयोजकांनी दिला आहे.
Back to top button