बीड

श्री क्षेत्र महादेवदरा ते पंढरपूर पायी पालखी रथ सोहळ्याचे १५ जुलै रोजी प्रस्थान

श्री क्षेत्र महादेवदरा ते पंढरपूर पायी पालखी

रथ सोहळ्याचे १५ जुलै रोजी प्रस्थान

आष्टी, दि. २ (प्रतिनिधी)

पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे , गात जागा गात जागा, प्रेम मागा विठ्ठला… या अभंगोक्तीनुसार, आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील श्री क्षेत्र महादेव मंदिर महादेवदरा संस्थान ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी पालखी रथ सोहळ्याचे यंदाचे भव्य प्रस्थान बुधवार दि. १५ जुलै २०२६ रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेला एक ‘नवीन रथ’ तयार करण्यात आला असून तो या सोहळ्यात सामील होणार असल्याची माहिती क्षेत्र विकासक ह.भ.प. कल्याण महाराज कोल्हे यांनी दिली आहे.

हा अध्यात्मिक सोहळा क्षेत्र विकासक ह.भ.प. कल्याण महाराज कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे. बुधवार, १५ जुलै रोजी सकाळी ठीक ८ वाजता पारंपरिक थाटात, टाळ मृदंगाच्या गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पायी पालखी रथाचे प्रस्थान होईल.

असा असेल पालखीचा प्रवास मार्ग, श्री क्षेत्र महादेवदरा येथून निघालेला हा पायी पालखी रथ सोहळा विविध गावांमधून भाविकांचे प्रबोधन करत पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. याचा प्रवास मार्ग खालील प्रमाणे
असेल. बीडसांगवी, देसुर, चिंचाळा, सिदेवाडी फाटा, सोलेवाडी, जामगाव, डोणगाव, अरणगाव, कवडगाव, चौंडी, चापडगाव, जातेगाव, कामोणे, करमाळा, आदिनाथ कारखाना, पांगरे फाटा, कंदर, कन्हेरगाव, वेणेगाव, टेंभुर्णी, दगडे अकोला, परिते, करकंब, होळे, भोसे, विठ्ठल सहकारी साखर कारखाना ते अंतिम मुक्काम श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणार आहे. भक्तांना सहभागी होण्याचे आवाहन यंदाचा सोहळा अधिक शिस्तबद्ध आणि भक्तीमय वातावरणात पार पाडण्यासाठी महादेवदरा देवस्थान सज्ज झाले आहे. या पालखी सोहळ्यात जास्तीत जास्त वारकरी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे भावपूर्ण आवाहन ह.भ.प. कल्याण महाराज कोल्हे, समस्त ग्रामस्थ बीडसांगवी आणि महादेव मंदिर ट्रस्ट (महादेवदरा) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदाच्या वारीमध्ये नवीन रथ आणण्यात आला असून सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्व विठ्ठल-महादेव भक्तांनी आपले जीवन कृतार्थ करण्यासाठी या पायी पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

– ह.भ.प. कल्याण महाराज कोल्हे

(क्षेत्र विकासक)

Back to top button