📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पाणवे गावात दिवसाढवळ्या धाडसी घरफोडी; म्हसळा तालुक्यात घबराट, चोरांचे धाडस वाढले!

पाणवे गावात दिवसाढवळ्या धाडसी घरफोडी; म्हसळा तालुक्यात घबराट, चोरांचे धाडस वाढले!
खिडकीचे स्लाईडिंग उघडून घरात प्रवेश; रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला
म्हसळा (संदेश घोलप): म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, पाणवे कुणबीवाडी येथे दिवसाढवळ्या झालेल्या धाडसी घरफोडीने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप न तोडता चक्क खिडकीवाटे प्रवेश करून घरातील कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी २१ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते २२ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान घडली. फिर्यादी सौ. समीक्षा शिगवण या कामानिमित्त बाहेर गेल्या असताना त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरांनी घराची पाळत ठेवली होती. घराला कुलूप असल्याची खात्री पटताच, चोरांनी मुख्य दरवाजाला हात न लावता खिडकीचे स्लाईडिंग हुशारीने उघडून आत प्रवेश केला.
घरात शिरल्यानंतर चोरट्यांनी थेट कपाटाकडे मोर्चा वळवला. कपाट फोडून त्यातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १९ हजार ५०० रुपये रोख रक्कम, असा एकूण ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरी केल्यानंतर चोरटे त्याच मार्गाने पसार झाले. सौ.शिगवण घरी परतल्यानंतर त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त दिसले आणि कपाट फोडल्याचे लक्षात आले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र म्हात्रे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील संशयास्पद हालचालींची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
ग्रामीण भागात अशा प्रकारे दिवसाढवळ्या चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “चोरटे आता भरवस्तीतही शिरण्याचे धाडस करत आहेत, त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत का?” असा प्रश्न रहिवासी विचारत आहेत.
पोलीस प्रशासनाचे आवाहन:
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे:
 * गावात किंवा वस्तीत फिरणाऱ्या अनोळखी आणि संशयास्पद व्यक्तींची माहिती तात्काळ पोलीस पाटलांना द्या.
 * घर बंद करून बाहेर जाताना शेजाऱ्यांना कल्पना द्या आणि शक्य असल्यास अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा (CCTV किंवा जादा कुलूप) लावा.
 * मौल्यवान दागिने आणि मोठी रोख रक्कम घरात ठेवणे टाळावे.
Back to top button