बीड
भगवानगड ट्रस्ट संचलित स्पर्धा परीक्षा केंद्रातील आणखी पाच विद्यार्थ्यांची अधिकारी पदी निवड

भगवानगड ट्रस्ट संचलित स्पर्धा परीक्षा केंद्रातील आणखी पाच विद्यार्थ्यांची अधिकारी पदी निवड
भगवानगड (प्रतिनिधी) : पुणे येथील रयत प्रबोधिनी ही स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मार्गदर्शक ठरणारी एक अग्रगण्य संस्था आहे. ह्या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रामुख्याने गट ब व गट क परीक्षा तसेच अनेक परीक्षांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. या संस्थेने ऑगस्ट २०२३ मध्ये शासकीय अधिकारीपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमात बोलताना श्रीगुरु शास्त्री बाबांनी श्री क्षेत्र भगवानगडावर आपण M.P.S.C. /U.P.S.C. स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार भगवानगडावरील स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शास्त्री बाबांनी रयत प्रबोधिनीवरच सोपवली होती. भगवानगडावर सुरु झालेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांनी अपार मेहनतीच्या जोरावर अनेकांनी अधिकारीपदाला गवसणी घातली आहे. त्यापैकी धनराज दिलीप बुरकुल
(Joint Director,Local Fund Accounts Audit, Nagpur Division, Nagpur), निखिल मोतीराम राऊत
(Law and Judiciary Department, Branch – Nagpur), अनिकेत सुरेश सरदार
(Joint Director, Accounts and Treasury, Nagpur Division, Nagpur), आकाश बाबासाहेब वाघ
(Chairman, State Consumer Dispute Redressal Commission, Mumbai, Outside Mumbai Region), चेतनकुमार अशोक अलोने
(Additional Commissioner, Tribal Development, Nagpur) अशा या विविध पदांवर भगवानगड ट्रस्ट संचलित स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तसेच यापूर्वी जय बाळू जपकर (कर सहाय्यक), ज्ञानेश्वर अंबादास दराडे (कालवा निरीक्षक अहिल्यानगर), अशोक बाजीराव ढाकणे (विद्युत सहाय्यक महावितरण), सूरज अहिरे (तलाठी व ग्रामसेवक), किरण भास्कर सानप (आरोग्य सेवक व महसूल सहाय्यक), सुभाष रंगनाथ मोहिते
(प्राध्यापक, S.B.E.S. कॉलेज, छत्रपती संभाजीनगर), विजय संजय दहिफळे (दारूबंदी पोलीस), पोपट संतोष जगताप (महसूल सहाय्यक), दीपक रामराव बटूळे (महसूल सहाय्यक), प्रफुल्ल गोदरु डोरले (कर निरीक्षक), रविकिरण अजिनाथ कुटे (महसूल सहाय्यक), दीपक आव्हाड (महसूल सहाय्यक) इत्यादी विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या खात्यात अधिकारीपदी निवड झालेली आहे. या निवडीबद्दल श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. आपल्या गडावर कीर्तनकारांसोबतच अधिकारी देखील घडवले जात असल्याने गडाच्या भक्तवर्गात देखील उत्साह व आनंदाचे वातावरण आहे.



