📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

विद्यार्थ्यांनी जगाची गरज ओळखून करिअर निवडावे – प्राचार्य डॉ. विजयकुमार बांदल यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी जगाची गरज ओळखून करिअर निवडावे – प्राचार्य डॉ. विजयकुमार बांदल यांचे प्रतिपादन

नेकनूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन मेळावा संपन्न

बीड (प्रतिनिधी): आज जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि रोजगाराची समीकरणे वेगाने बदलत आहेत. अशा काळात विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक वाटांवर न चालता,  जगाची नेमकी काय गरज आहे’ हे ओळखून आपल्या करिअरची दिशा निश्चित करावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विजयकुमार बांदल यांनी केले.

नेकनूर येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ तथा करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. हा कार्यक्रम सोमवार, दि.८ रोजी डॉ.अब्दुल कलाम संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, नेकनुर येथे उत्साहात पार पडला.

पुढे बोलताना डॉ. बांदल म्हणाले की, दहावी आणि बारावीनंतर केवळ मेडिकल किंवा इंजिनिअरिंग या क्षेत्रांचा विचार न करता माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, लॉ, मीडिया, फॅशन डिझायनिंग, गव्हर्नमेंट बँकिंग, सी.ए., इन्शुरन्स स्किल्स, टॅली, जीएसटी, एमपीएससी, यूपीएससी, हेल्थकेअर आणि नर्सिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या आधुनिक कौशल्यांकडे वळावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी. डी. राऊत यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की, मुलांनी नवनवीन करिअरच्या संधींकडे वळावे. पारंपारिक संधींपेक्षा आधुनिक संधींचा स्वीकार करून विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

यानंतर दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.प्रमोद वंजारे, सूत्रसंचालन प्रा.निखात शेख व प्रा.आयशा शेख यांनी केले तर आभार प्रा. ऋतुजा अजब यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button