बीड
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी आ. संदीप क्षीरसागर आग्रही

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी आ. संदीप क्षीरसागर आग्रही
बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची भेट घेऊन निवेदन दिले
बीड दि.८ (प्रतिनिधी) :- शहरातील बायपासवर म्हणजेच महालक्ष्मी चौक येथे असलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा अस्तित्वात आहे. परंतु छत्रपती संभाजीनगर येथील क्रांतीचौकाच्या धर्तीवर बीडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी आ. संदीप क्षीरसागर आग्रही असून, यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बुधवारी (दि.८) सकाळी भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली आणि निवेदन दिले आहे.
बीड शहरातून जाणारा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग आहे. शहरात वाहनांची वर्दळ वाढू नये म्हणून खजाना बावडी ते रामनगर असा बायपास रस्ता करण्यात आला आहे. परंतु या बयपासवर शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल नसल्याने नियमित अपघाताच्या घटना घडत होत्या. तसेच काही ठिकाणी स्लीप रोड नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या अपघात आणि त्रासातून सुटका व्हावी म्हणून आ. संदीप क्षीरसागर प्रयत्नशील होते. यासाठी शहरात प्रवेश करण्याच्या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल आणि आवश्यक ठिकाणी स्लीप रोडसाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. यासाठी त्यांनी शासन, प्रशासन आणि आ. संदीप क्षीरसागर व माजी आ. सय्यद सलीम यांनी यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल आणि स्लीप रोडचे काम सध्या सुरू आहे.
त्यानंतर आता आ. संदीप क्षीरसागर यांनी बायपासवर महालक्ष्मी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळयाची उंची वाढवून सुसज्ज स्मारक व्हावे अशी मागणी केली आहे. यापूर्वी आ.क्षीरसागर यांनी याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी केली होती. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बीड शहराच्या बायपास रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात यावे यासाठी सविस्तर निवेदन सादर केले. याबाबत सविस्तर माहिती दिली. लवकरच याबाबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले. हे स्मारक झाले तर बीड शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे.



