बीड
पती अनेक महिन्यांपासून बेपत्ता, सावकारांची चौकशी करा ज्ञानेश्वरी बोबडे यांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

पती अनेक महिन्यांपासून बेपत्ता, सावकारांची चौकशी करा
ज्ञानेश्वरी बोबडे यांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी
बीड (प्रतिनिधी):- सावकाराच्या जाचास कंटाळून लहान दिराने आत्महत्या केली, तसेच माझ्या पतीला बेपत्ता करण्यात आले आहे. त्यामुळे सावकारांची चौकशी करुन माझ्या पतीचा शोध लावावा अशी मागणी बीड येथील ज्ञानेश्वरी बजरंग बोबडे यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदानाद्वारे केली आहे.
पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार, बजरंग बोबडे हे जुलै २०२१ मध्ये कापसाच्या व्यापाऱ्यांसोबत बैठक आहे असे सांगून घरुन गेले होते मात्र ते परत आले नाहीत. त्यामुळे मंगेश बोबडे यांनी ३ जून २०२१ रोजी पेठबीड पोलिस ठाण्यात मिसींग दाखल केली होती. त्यानंतर काही दिवसांनी बजरंग हे परत आले. त्यानंतर इतक्या दिवस कोठे होता अशी विचारणा केली असता काही व्यापारी लोकांचे देणे झाल्याने त्यांनी खासगी सावकाराचे कर्ज घेतले होते. सुदर्शन धांडे, अशोक गव्हाणे, दिलीप खांडे, दिलीप धूत, स्मिता धूत, शुभम धूत, संतोष घिगे, विकास शिंदे, भारत मते आणि हनुमंत पिंगळे या सावकारांनी डांबुन ठेवल्याचे सांगितले. सर्वांचे पैसे परतफेड करुनही हे सर्व त्रास देत असल्याचे सांगितले. त्यानंतर मंगेश बोबडे यांना सुद्धा या सावकारांनी पैशासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. चेकचा गैरवापर करुन खोट्या केसेस केल्या. त्यामुळे मंगेश हे सतत तणावाखाली होते. बजरंग यांनी सावकारांचे पैसे परत देऊनही सावकार त्रास देत होते. दरम्यान १९ एप्रिल २०२४ रोजी मंगेश हे दुपारी घरी आले. त्यांनी बजरंग यांचे कपाट उघडले असता त्यात बजरंग यांनी १५ डिसेंबर २०२१ रोजीचे दोन अर्ज, मोबाईल स्क्रीनशॉटची प्रिंट, दोन सीडी आणि पेन ड्राईव्ह सापडला. सुदर्शन धांडे यांच्याकडून ४० लाख रुपये प्रति महिना १० रुपये शेकड्याने घेतले होते. त्या पोटी त्यांनी दोन कोरे चेक सही करुन आणि एक कोरा बॉन्ड सही करुन दिला होता. बजरंगने व्याजासह सर्व रक्कम परत करुनही धनादेशांचा आणि बॉन्डचा उपयोग करुन खोट्या केसेस करण्याच्या धमक्या देत होते. सुदर्शन धांडे आणि अशोक गव्हाणे हे बजरंग यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. तसेच पेन ड्राईव्ह तपासला असता दिलीप खांडे हा बजरंगला शिवीगाळ व धमक्या देत असल्याची व्हिडिओ क्लिपमध्ये दिसून आले. सावकारांचे कर्ज व्याजासह फेडलेले असतानाही ते सावकार अजुन पैसे मागत होते. त्यानंतर बजरंग हे बेपत्ता झाले अद्याप त्यांचा शोध लागला नाही. सावकारांची चौकशी करण्याची मागणी ज्ञानेश्वरी बोबडे यांनी केली आहे.
——————
खोट्या केसेस करण्यास सुरुवात
बजरंग यांच्याकडून बळजबरीने घेतलेल्या चेकचा गैरवापर करुन वेगवेगळ्या माणसांच्या नावे खोट्या केसेस करण्यास सुरुवात केली. संतोष नामदेव घिगे, विलास साहेबराव शिंदे या लोकांशी कसलाही संबंध नसताना त्यांनी बजरंग यांच्यावर खोट्या केसेस केल्या. या दोघांच्या मागे हे सर्व सावकार आहेत.
—————
मंगेश यांनी केली आत्महत्या
१९ एप्रिल २०२४ रोजी दुपारी मंगेश बोबडे यांनी सावकाराच्या जाचापोटी विष प्राशन केले होते. त्यांच्यावर दीप हॉस्पिटल येथे उपचार केले. त्यावेळी पोलिसांनी जबाब देखील घेतला मात्र कोणतीच कारवाई केली नाही. त्यानंतर पुन्हा सावकारांनी त्रास देणे सुरुच ठेवले. संतोष घिगे, विलास शिंदे व भारत मते यांनी मंगेश यांना रस्त्यात आडवून मारहाण केली होती. शुभम व स्मिता व दिलीप धूत यांच्या सांगण्यावरुन ही मारहाण झाली होती. तसेच दिवाळीच्या अगोदर एक-दोन दिवस अशोक गव्हाणे, दिलीप खांडे यांनी मंगेश बोबडे यांना जालना रोडवर आडवून मारहाण केली. त्यामुळे ३ नोव्हेंबर २०२४ रोजी घरातील लोखंडी ॲंगलला दोरीने गळफास घेतला होता. या प्रकरणी पेठबीड ठाण्यात गुन्हा दाखल असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.



