बीड

“नमामी इंद्रायणीला वेग – नदी संवर्धनासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मान्यता”

“नमामी इंद्रायणीला वेग – नदी संवर्धनासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मान्यता”

“मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होणार”

 

सुहास सावंत / पिंपरी चिंचवड:-इंद्रायणी नदी संवर्धनासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, ‘नमामी इंद्रायणी’ प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. इंद्रायणी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी दोन मलनि:स्सारण प्रकल्पांना (STP) राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडून मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकल्पामुळे नदी संवर्धन, पूरनियंत्रण, पाण्यावर प्रक्रिया तसेच सौंदर्यीकरणाची महत्त्वाची पावले उचलली जाणार आहेत.

एकूण ५२६ कोटींचा हा प्रकल्प असून, अमृत २.० योजनेअंतर्गत तो राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे ४० आणि २० एमएलडी क्षमतेचे दोन मलनि:स्सारण प्रकल्प उभारले जाणार आहेत. यात पावसाचे पाणी साठवण्यासाठी जलनि:स्सारण प्रणाली, प्रदूषित पाणी मलनि:स्सारण प्रकल्पाकडे वळविण्यासाठी इंटरसेप्टर, नदीकाठी दांड बंधाऱ्यांचे बांधकाम, नद्यांच्या तटबंदीचे सक्षमीकरण आणि नदीपात्रातील तळवर्धन करण्यात येणार आहे.

याशिवाय नदीकाठावरील हरित क्षेत्राचा विकास, तसेच नयनरम्य पर्यटनस्थळ म्हणून नदीकाठाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून, नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आटोक्यात येईल.

या निर्णयाबद्दल स्थानिक आमदार महेश किसनराव लांडगे यांनी आनंद व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. “नमामी इंद्रायणी” प्रकल्पामुळे नदी संवर्धनासह पर्यावरणीय समतोल राखला जाणार असून, शहराच्या विकासात हा टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे, असे महेशदादा लांडगे यांनी सांगितले.

Back to top button