📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
महाराष्ट्र

अमरावतीत एमएच-टीईटी परीक्षा सुरळीत; जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यामुळे व्यवस्थापन अधिक काटेकोर

-पंकज हिरूळकर (जिल्हा प्रतिनिधी) अमरावती :

राज्यातील महत्त्वपूर्ण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (एमएच-टीईटी) अमरावती जिल्ह्यातील 36 केंद्रांवर आज शांत, सुरळीत आणि सुरक्षा व्यवस्थेसह पार पडली. जिल्ह्यात पेपर-१ साठी 5,865 आणि पेपर-२ साठी 9,365 नोंदण्या झाल्या होत्या. त्यापैकी अनुक्रमे 5,530 आणि 8,856 परीक्षार्थींनी उपस्थिती नोंदवली.

परीक्षा सुरळीत पार पाडली जात आहे याची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सकाळपासून विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. जिल्हा परिषद कन्या शाळा, ज्ञानमाता हायस्कूल आणि होली क्रॉस शाळा या केंद्रांवरील व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. परीक्षेदरम्यान कोणत्याही परीक्षार्थीला अडथळा येऊ नये, यासाठी आवश्यक ते निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

जिल्हा परिषद कन्या शाळेच्या परिसरात सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामामुळे होणारा आवाज पाहणीदरम्यान त्यांच्या निदर्शनास आला. त्यावर श्री. येरेकर यांनी परीक्षा पूर्ण होईपर्यंत बांधकामकार्य तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले.

तसेच उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षा कक्षात प्रवेश द्यावा, प्रवेशपत्र व आधार तपासणी जलदगतीने करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी सर्व केंद्र प्रमुखांना दिल्या.

परीक्षा व्यवस्थापनासाठी जिल्हा संनियंत्रण समिती सक्रिय होती. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रसंचालक, सहाय्यक परिरक्षक, झोनल अधिकारी आणि शिक्षण विभागातील यंत्रणा पूर्ण दिवस दक्ष होती. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही निगराणी, तसेच बायोमेट्रिक, स्क्रिनिंग व फेस रिकग्निशनद्वारे परीक्षार्थींची ओळख पटविण्याची प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि योजना शिक्षणाधिकारी यांच्या भरारी पथकांनी विविध केंद्रांवर अचानक भेटी देत व्यवस्थेची पाहणी केली. यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया शिस्तबद्ध, पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पूर्ण झाली.

Back to top button