अतिक्रमणावर कारवाई न झाल्यास जामखेड बेमुदत बंद -विकास राळेभात यांचा इशारा

अतिक्रमणावर कारवाई न झाल्यास जामखेड बेमुदत बंद -विकास राळेभात यांचा इशारा
जामखेड | प्रतिनिधी
जामखेड शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर तातडीने आणि ठोस कारवाई न झाल्यास जामखेड शहर बेमुदत बंद करण्याचा इशारा युवा नेते विकास (तात्या) राळेभात यांनी दिला आहे.
शहरातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर तसेच बाजारपेठ परिसरात वाढलेल्या अनधिकृत अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून नागरिकांना दैनंदिन हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. तसेच रस्त्याच्या अपुर्ण कामामुळे रस्त्यालगत असलेली फळे, भाजीपाला, दूध विक्री केंद्रे तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स धुळीच्या विळख्यात आल्याने सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
राळेभात म्हणाले की, शहराच्या सुशोभीकरणासाठी, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अतिक्रमणमुक्त मोहीम तातडीने राबविणे गरजेचे आहे. प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही, तर सर्वच राजकीय पक्ष,व्यापारी, नागरिक आणि सामाजिक संघटनांच्या सहकार्याने जामखेड शहर बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.



