बीड

विंचरणा नदीला महापूर; तपनेश्वर महादेव मंदिर पाण्यात, जवळच्या गावांचा मार्ग बंद

विंचरणा नदीला महापूर; तपनेश्वर महादेव मंदिर पाण्यात, जवळच्या गावांचा मार्ग बंद

जामखेड प्रतिनिधी – जामखेड शहरातील विंचरणा नदीला आलेल्या महापुरामुळे शुक्रवारी शहरातील परिस्थिती तणावपूर्ण झाली. प्रचंड पाण्यामुळे नदीकाठावरील मूळ तपनेश्वर महादेव मंदिर परिसर पाण्याखाली गेला असून मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरल्याचे स्थानिकांनी सांगितले.

नगर रोडवरील पुलावरून नदीचा प्रचंड लोट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.शेकडो नागरिक पुलावर जमले, तर काहींनी मोबाईलवर थेट प्रक्षेपण करून ही परिस्थिती सोशल मीडियावर दाखवली. पुलाखालून पाणी जोरात वाहत असल्याने प्रशासनाने पुलावरील वाहतूक मर्यादित केली असून अनावश्यक गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, महापुरामुळे जामखेड शहरातून जवळच्या गावांकडे जाणारे काही रस्ते पाण्याखाली गेले असून ते मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे व पाण्याचा प्रवाह कमी होईपर्यंत थांबण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.

शहरातील नदीलगतच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी म्हणून जनावरे आणि घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून नदीच्या पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. स्थानिकांनी सांगितले की, यापूर्वीही अशा प्रमाणात पाणी आल्याची आठवण फक्त काही वर्षांपूर्वीची आहे. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे.

Back to top button