मुंबई

राऊत स्वतःला न्यायाधीश समजतात; पुन्हा आमदार प्रसाद लाड यांनी साधना निशाणा

 

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दोनच दिवसांपूर्वी ईडीने तब्बल १२ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले होते. याच मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला होता. अनिल देशमुख स्वत:हून ईडीसमोर हजर झाले आहेत. आता ईडीची जबाबदारी आहे की, जे तक्रारदार आहेत त्यांना ईडीने समोर आणावं. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी असे बरेच लोक पळून गेले आहेत. त्यांना देशात आणले का? हे सर्व लोक पळून जाण्यास केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्राच्या मदतीशिवाय ते पळून जाऊच शकत नाहीत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.

राऊत यांच्या या वक्तव्याला भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे स्वतःला धर्माधिकारी असल्या सारखे वागत आहेत, ते स्वतःला न्यायाधीश समजतात. देशमुखांबाबत ते जे वक्तव्य करत आहेत, त्याचा अभ्यास त्यांनी आधी करावा. पोलिसांच्या बदल्यांमधला भ्रष्टाचार, अनिल देशमुख आणि वाझे यांच्यातील संबंध, शंभर कोटींचे आरोप याबाबत राऊत काहीच बोलत नाहीत. ते फक्त केंद्रावर उटसूट टिका करण्याचे काम करतात असे लाड यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना लाड म्हणाले की, केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊन जनतेला दिलासा मिळाला आहे. मात्र आता राज्य सरकार पेट्रोलचे दर कमी करण्याऐवजी केंद्राने घटवलेल्या उत्पादन शुल्कावरून टीका करत आहे. परंतु केंद्राने पेट्रोल स्वस्त केले आता ते पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणार का यावर कोणीच बोलत नसल्याचा टोला देखील लाड यांनी यावेळी लगावला आहे.

Back to top button