बीड
गोदावरीत हप्तेखोरीचा खेळ? महसूल-पोलीस प्रशासन एसीबीच्या रडारवर…!

गोदावरीत हप्तेखोरीचा खेळ? महसूल-पोलीस प्रशासन एसीबीच्या रडारवर…!
गेवराई (अंकुश आतकरे) गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या वाळू उपसा प्रकरणाने पुन्हा एकदा जोर धरला असून, या संपूर्ण व्यवहारात महसूल व पोलीस प्रशासनाकडून हप्ते गोळा केल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने संबंधित यंत्रणांवर गुप्तपणे नजर ठेवण्यास सुरुवात केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
गोदावरी नदीकाठच्या विविध गावांमध्ये रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. जेसीबी, पोकलेन आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू काढून वाहतूक केली जात असून, या सर्व प्रक्रियेसाठी ठराविक ‘हप्ते’ देऊनच कामे सुरळीत सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हा प्रकार शक्य नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, कारवाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला जातो; प्रत्यक्षात मात्र वाळू माफियांना मोकळे रान दिले जाते. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, पर्यावरणालाही मोठा फटका बसत आहे. नदी पात्रातील अतिक्रमण व खोल खड्ड्यांमुळे भविष्यात पूरस्थितीचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, एसीबीने या प्रकरणाची प्राथमिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून, काही संशयित व्यवहारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हालचाली, आर्थिक व्यवहार आणि संपर्क यांची पडताळणी सुरू असल्याचे समजते. लवकरच या प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चौकट : “हप्ते दिल्याशिवाय कामच होत नाही”
गोदावरी काठावरील काही वाहनचालक व ठेकेदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “दररोज ठराविक रक्कम दिल्याशिवाय एकही ट्रॅक्टर बाहेर पडत नाही. कारवाईची भीती दाखवून पैसे उकळले जातात.”
सदर प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.


