बीड
घंटागाडी बनली शोभेची वस्तू; पाच महिन्यांपासून एकाच जागी उभी

घंटागाडी बनली शोभेची वस्तू; पाच महिन्यांपासून एकाच जागी उभी
तलवाड्यात गल्लीबोळात कचऱ्याचे ढीग; स्वच्छतेच्या नावाने बोंब, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
तलवाडा | प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे ३ लाख ७६ हजार रुपये खर्च करून ‘स्वच्छ तलवाडा, सुंदर तलवाडा’ या उद्देशाने घंटागाडी खरेदी केली. मात्र, ही घंटागाडी खरेदी केल्यानंतर गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून एकाच जागेवर उभी असल्याने ती आता शोभेची वस्तू ठरल्याचे चित्र आहे. दरम्यान, गावातील गल्लीबोळात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावातील कचरा नियमितपणे उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी घंटागाडीची खरेदी करण्यात आली होती. मात्र, नवीन गाडीचा वापरच होत नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अनेक दिवस गाडी एकाच ठिकाणी उभी असल्याने तिची बॅटरी व इतर यंत्रसामग्री खराब होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या या वाहनाचा उपयोग नेमका कधी होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, तलवाडा ग्रामपंचायतीतील पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या खर्चाबाबतही नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. काही विकासकामे प्रत्यक्षात झाली आहेत का, तसेच झालेल्या कामांची कागदपत्रे, इस्टिमेट व मेजरमेंट बुक उपलब्ध आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दोन ते अडीच लाख रुपये किमतीच्या घंटागाडीवर पावणे चार लाख रुपयांपर्यंतचा खर्च दाखविल्याची चर्चा असून, या बाबींची अधिकृत चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
गेल्या दोन महिन्यांत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून मोठ्या प्रमाणात निधी खर्च अथवा उचल झाल्याची चर्चा गावात सुरू आहे. मात्र, त्याच तुलनेत गावातील रस्ते, स्वच्छता, पाणी, वीज आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांची स्थिती समाधानकारक नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे निधीचा प्रत्यक्ष वापर आणि विकासकामांची स्थिती याबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गावातील नागरिकांना विविध प्रमाणपत्रे व शासकीय कामांसाठी ग्रामपंचायतीत हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारीही आहेत. अशा परिस्थितीत स्वच्छतेसाठी खरेदी केलेली घंटागाडी धूळ खात उभी राहणे ही बाब ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.
घंटागाडी तातडीने सुरू करून गावातील कचरा नियमित उचलण्यात यावा, तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या खर्चाची पारदर्शकपणे माहिती नागरिकांसमोर ठेवावी, अशी मागणी तलवाडा ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.



