📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जुजगव्हाण लघु प्रकल्पावरील अनधिकृत विद्युत मोटारी काढल्या विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या सूचनेनुसार पाणी उपशावर महसूल प्रशासनाची कारवाई ; पुन्हा मोटारी टाकल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

जुजगव्हाण लघु प्रकल्पावरील अनधिकृत विद्युत मोटारी काढल्या
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या सूचनेनुसार पाणी उपशावर महसूल प्रशासनाची कारवाई ; पुन्हा मोटारी टाकल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
    पावसाने ओढ दिल्याने उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील जुजगव्हाण येथील लघु प्रकल्पावर अनधिकृतपणे सुरू असलेल्या विद्युत मोटारी काढून घेण्यात आल्या. तलावातील उपलब्ध पाण्याचा अनधिकृत उपसा करून जलसाठा कमी होऊ नये , यासाठी महसूल , पाटबंधारे आणि विद्युत विभागाच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली. जुजगव्हाण लघु प्रकल्पातील पाण्याचा अनधिकृतपणे उपसा करण्यासाठी विद्युत मोटारी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर तलावातून पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी काढून घेण्यात आल्या. उपलब्ध जलसाठा हा परिसरातील शेतकरी आणि भविष्यातील पाणी गरजेसाठी महत्त्वाचा असल्याने त्याचा अनधिकृत उपसा रोखण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. “ पावसाने ओढ दिल्यामुळे उपलब्ध जलसाठा जपणे अत्यंत आवश्यक आहे. तलावातून अनधिकृतपणे पाणी उपसा करण्यासाठी पुन्हा विद्युत मोटारी टाकल्यास संबंधितांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. इतर जलसाठ्यांवरही अशाच प्रकारे पाहणी करून अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास कारवाई केली जाईल , ” असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले. जलसाठ्यातील पाणी केवळ आजच्या गरजेसाठी नसून आगामी काळातील पिण्याचे पाणी , शेती आणि जनावरांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे , असे आवाहन करण्यात आले आहे.
     पावसाचे प्रमाण आणि उपलब्ध जलसाठ्याची स्थिती लक्षात घेता जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. तलावांमधील पाण्याचा अनधिकृत उपसा होणार नाही , यासाठी महसूल , जलसंपदा आणि विद्युत विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी. उपलब्ध पाणी आगामी काळातील गरजा लक्षात घेऊन जपून वापरावे , असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे. उपलब्ध जलसाठ्याचे संवर्धन करताना पिण्याचे पाणी , जनावरांची गरज आणि शेतीसाठी आवश्यक पाण्याचा प्राधान्यक्रम लक्षात घेणे गरजेचे आहे. पाण्याचा अनधिकृत उपसा किंवा अपव्यय आढळल्यास संबंधित विभागांनी तत्काळ दखल घेऊन नियमानुसार कारवाई करावी , असे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आवाहन केले आहे. पावसाने ओढ दिलेल्या काळात जलसाठ्यावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे जलसाठ्याची सद्यस्थिती , पाण्याची आवक आणि वापर याचा नियमित आढावा घेऊन संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पूर्वनियोजन करावे , असे अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी सांगितले.
       जलसाठ्यांवरील अनधिकृत पाणी उपशावर लक्ष ठेवून संबंधित यंत्रणांनी स्थानिक पातळीवर नियमित पाहणी करणे आवश्यक आहे. तलावातून अनधिकृतपणे पाणी उपसा करण्यासाठी मोटारी बसविणे , पाइपलाइन टाकणे अथवा अन्य कोणत्याही माध्यमातून पाण्याचा नियमबाह्य वापर होत असल्यास त्याची तातडीने नोंद घेऊन वरिष्ठांच्या निदर्शनास आणावी , असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सांगितले. जुजगव्हाण येथील कारवाईनंतर बीड तालुक्यातील इतर लघु प्रकल्प , तलाव आणि जलसाठ्यांमधून होणाऱ्या अनधिकृत पाणीउपशावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. पावसाने ओढ दिल्याने जलसाठ्यांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनधिकृत विद्युत मोटारींच्या माध्यमातून होणारा पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल , पाटबंधारे आणि विद्युत विभागाने समन्वयाने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जलसाठ्यांच्या स्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जलसाठ्यातील उपलब्ध पाणी भविष्यातील गरजांसाठी सुरक्षित राहावे , यासाठी स्थानिक पातळीवर महसूल अधिकारी आणि ग्रामस्तरीय यंत्रणेने दक्ष राहावे. पाण्याचा अनधिकृत उपसा अथवा अपव्यय आढळल्यास संबंधित विभागाला तातडीने माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
        जुजगव्हाण येथील कारवाईसाठी मंडळाधिकारी पुरुषोत्तम आंधळे , ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) जावेद शेख , पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक श्री. कोरडे , एम.एस.ई.बी. विभागाचे श्री. कदम उपस्थित होते. तसेच गावचे सरपंच रवी गंगावणे , उपसरपंच श्रीराम सुरवसे , ग्रामपंचायत कर्मचारी , पोलीस पाटील यांच्यासह दत्ता जाधव , मुगाजी मुळे , रामप्रसाद सुरवसे , बंडू थापडे , बळीराम सुरवसे , गोकुळ सुरवसे , संजय देवकते , हरीश सुरवसे आणि विशाल सुरवसे उपस्थित होते. पावसाने ओढ दिलेल्या काळात उपलब्ध जलसाठ्याचे संवर्धन करणे ही प्रशासनाबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी आहे. तलावातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्याबरोबरच पाण्याचा अपव्यय टाळणे , शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे.
       ‘ पाणी जपा ; जलसाठे जपा ’ या भावनेतून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. “ आजचा जपलेला प्रत्येक थेंब उद्याच्या पाणीटंचाईवर मात करण्याची ताकद देईल. त्यामुळे अनधिकृत पाणी उपसा टाळा , जलसाठे जपा आणि प्रशासनाला सहकार्य करा. इतर जलसाठ्यांवरही अशाच प्रकारच्या कारवाया करण्यात येतील , ” असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.
.
Back to top button