बीड
बीडमध्ये होणार चवदार तळे ऐतिहासिक संघर्षाचा नाट्यप्रयोग

बीडमध्ये होणार चवदार तळे ऐतिहासिक संघर्षाचा नाट्यप्रयोग
प्रवेश मोफत, नाट्यप्रयोगाचा आनंद घ्या
बीड/प्रतिनिधी
भारतीय सामाजिक इतिहासातील समता, स्वाभिमान आणि मानवी हक्कांच्या लढ्याला रंगमंचावर प्रभावीपणे साकारण्याचा प्रयत्न बीडमध्ये होणार आहे. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित विशेष नाट्यप्रयोगाचे आयोजन सोमवार (दि.३१) ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कॅनॉल रोड, इंदिरा नगर, बीड येथे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या माध्यमातून तसेच युगंधर क्रिएशन्स एल.एल.पी.निर्मित हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. राजकुमार बडोले लिखित या नाटकाच्या माध्यमातून महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या अनुषंगाने सामाजिक विषमता, जातिभेद, मानवी प्रतिष्ठा आणि समतेच्या संघर्षाचे चित्रण करण्यात आले आहे.
महाडच्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घडलेला चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्याच्या हक्कासाठीचा संघर्ष नव्हता; तो मानवी समानता आणि आत्मसन्मानासाठी उभा राहिलेला ऐतिहासिक लढा होता. याच संघर्षाची तीव्रता, तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि परिवर्तनाची धग नाट्यरूपातून प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न या प्रयोगातून करण्यात आला आहे.
नाटकाची निर्मिती शरद रा. बडोले यांनी केली असून सहनिर्माता गोविंद मोडक आहेत. नाटकाचे दिग्दर्शन प्रशांत निगडे यांनी केले आहे. या नाट्यप्रयोगात
सशांक पांचाळ, अजित रांजणे, मयुरेश मढवी, दत्ता शेट्ये, अमोल जाधव, प्रेम जेटीथोर, अक्षता वराडकर, सायली नंदा, राजू भिलारे, तेजस राजे, मयुरी निकम, महादेव जाधव, मृणाल खिस्मतराव, अमोद करंदीकर यांनी भूमिका साकारल्या आहेत. या प्रयोगासाठी मोफत प्रवेश ठेवण्यात आला असून बीड शहरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.



