📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मराठा आरक्षण आंदोलनातून माघार घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची साथ सोडणार नाही!

मराठा आरक्षण आंदोलनातून माघार घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची साथ सोडणार नाही!
गंगाधर काळकुटे पाटील यांची फेसबुक पोस्ट चर्चेत
गेवराई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण आंदोलनात संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्यामुळे आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप गंगाधर काळकुटे पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली असून, कोणत्याही परिस्थितीत आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
गंगाधर काळकुटे पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गरीब आणि सर्वसामान्य मराठा बांधवांना आरक्षणाचा लाभ मिळावा, या उद्देशाने आपण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनासोबत आहोत. मात्र, काही लोकांकडून जाणीवपूर्वक आपल्याला लक्ष्य केले जात असून, वेगवेगळे कपोलकल्पित आरोप करून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
तसेच, आंदोलनापूर्वी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती कार्यक्रमातील छायाचित्रे व्हायरल करून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
“माझी जी काही चौकशी करायची असेल ती करावी. खोटे आरोप करून मला तुरुंगात टाकले तरी मी मागे हटणार नाही. मात्र, मनोज दादा जरांगे पाटील यांची साथ सोडणार नाही,” अशी ठाम भूमिका काळकुटे पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून मांडली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि सर्वसामान्य मराठा बांधवांना न्याय मिळावा, या भूमिकेतून आपण आंदोलनात सक्रिय असल्याचे सांगत, कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, गंगाधर काळकुटे पाटील यांच्या या फेसबुक पोस्टमुळे त्यांच्या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.
Back to top button