
जिल्हाधिकारी साहेब, आपण कलावंतांवर आत्मदहनाची वेळ आणली!
*बीड जिल्ह्यातील कलाकार तीन वर्षांपासून मानधनापासून वंचित*
बीड (प्रतिनिधी) – गेल्या तीन वर्षांपासून बीड जिल्ह्यातील कलावंत राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेतून मिळणाऱ्या लाभापासून वंचित असल्याने कलावंतांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, अर्थमंत्री, पालकमंत्री आणि विभागीय आयुक्त यांना पाठविलेल्या निवेदनातून येत्या आठ ते दहा दिवसात समितीची मीटिंग घेऊन मानधन वाटप करावे अन्यथा पुढील महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कलावंत मंडळी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आल्याने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कलावंतांवर आत्मदहन करण्याची वेळ आणल्याची एकच चर्चा जिल्हाभरात होऊ लागली आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेच्या लाभार्थींना लाभ मिळत नाहीये तसेच कलाकार निवड समितीची बैठक सुद्धा अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी आणि सचिव सदस्य असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सदस्य असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी घेत नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून बीड जिल्ह्यातील कलावंत लाभापासून वंचित आहेत.
अनेक वयोवृद्ध व ज्येष्ठ कलावंतांवर उपासमारीची वेळ सुद्धा आलेली आहे. अशा कलाकारांमध्ये पुरुष कलाकारांसह महिला कलाकारांचा ही समावेश आहे. तसेच अनेक ज्येष्ठ महिला कलावंत या विधवा आहेत. तर अनेक पुरुष ज्येष्ठ कलाकार आपला उदरनिर्वाह “बुडत्याला काडीचा आधार” प्रमाणे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मानधनावर चालवितात.
गेल्या तीन वर्षांपासून या योजनेसाठी गठीत केलेल्या समितीची सर्वसाधारण बैठक सुद्धा जिल्हाधिकारी यांनी अजून पर्यंत घेतलेली नाही. यामुळे शासनाकडून कलावंतांसाठी दरवर्षी येणारे कोट्यावधी रुपये अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे कलावंतांना मिळू शकलेले नाही.
शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी समितीची बैठक दरवर्षी घेऊन कलावंतांची निवड केली असती तर गेल्या तीन वर्षापासून शेकडो कलावंत मानधनापासून वंचित राहिले नसते.
मानधनाविना तीन वर्ष संपत आले तरीही समितीची ना बैठक घेण्यात येते, ना ज्येष्ठ कलावंतांना या योजनेतून लाभ मिळतोय. यामुळे सर्व ज्येष्ठ कलावंतांनी वैतागून सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला असून येत्या आठ ते दहा दिवसात जिल्हाधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या योजनेचा व कलावंतांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून समितीची बैठक बोलावून कलाकारांची निवड करावी आणि शासनाकडून देण्यात येणाऱ्या मानधनाचा लाभ मिळवून द्यावा.
अन्यथा येत्या सप्टेंबर (२०२६) महिन्यात सर्व कलावंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला असून आता कलावंतांच्या या समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी काय पाऊल उचलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवेदनावर चंद्रकांत लिंबाजी भालेराव, मोहन रुद्रा दराडे, लक्ष्मण नामदेव खेडकर, अशोक तुकाराम बुरंगे, छाया कोकाटे, महादेव कारभारी खेडकर, यांच्यासह इतरांची नावे व सह्या आहेत.



