मिलिंदनगरात नागरिकांचे हाल – गटाराचे चेंबर तुटले, घंटागाड्या ठप्प; नागेश विद्यालयामागे पाणीगळतीने रस्ता जलमय…

मिलिंदनगरात नागरिकांचे हाल – गटाराचे चेंबर तुटले, घंटागाड्या ठप्प; नागेश विद्यालयामागे पाणीगळतीने रस्ता जलमय…
प्रशासनाविरोधात आ.रोहित दादा पवार यांच्याकडे दिपक घायतडक यांची तक्रार
जामखेड : शहरातील मिलिंदनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांचे हाल सुरू आहेत. परिसरातील गटारांची चेंबरे तुटल्यामुळे व ब्लॉक झाल्यामुळे साचलेले पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरत आहे.त्याचप्रमाणे फॉगिंग फवारणी बंद असल्याने डासांचा प्रार्दुभाव वाढला असून रोगराई वाढली आहे,त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
यात भर म्हणून नगरपरिषदेच्या घंटागाड्या वेळेवर न आल्याने कचरा रस्त्यावर साचून राहतो. येणारे कर्मचारीदेखील कचरा व्यवस्थित उचलत नाहीत. उलट नागरिकांना उद्धटपणे वागणूक देतात, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते, आ.रोहित दादा पवार यांचे कट्टर समर्थक दिपक पोपटराव घायतडक यांनी केली आहे.
दरम्यान, श्री नागेश विद्यालयाच्या वसतिगृहामागील रस्त्यावर पाण्याच्या वॉलमधून वारंवार गळती होत असल्याने संपूर्ण रस्ता पाण्याखाली जाऊन,दिवसभर वाहणाऱ्या या पाण्यामुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला यांना चालताना मोठी कसरत करावी लागते. या परिस्थितीमुळे अपघाताची शक्यता वाढली असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
या सर्व समस्येकडे लक्ष वेधत मिलिंदनगर येथील आ. रोहित दादा पवार यांचे युवा कार्यकर्ते दिपक पोपटराव घायतडक यांनी जामखेड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने गटारांची साफसफाई करून तुटलेली चेंबरं दुरुस्त करावीत, घंटागाड्यांची नियमित सेवा सुरू करावी तसेच नागेश विद्यालयामागील पाणीगळती रोखून रस्ता स्वच्छ करावा, अशी ठाम मागणी आ.रोहित दादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे व आमसभेत केली आहे.



