जिजाऊ ब्रिगेड अंजनगाव सुर्जीच्या वतीने संत गाडगेबाबांची पुण्यतिथी श्रद्धेने साजरी

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी | राष्ट्रीय समाजसुधारक, स्वच्छतेचे प्रणेते आणि मानवतेचे पुजारी संत श्री.गाडगेबाबा यांची पुण्यतिथी जिजाऊ ब्रिगेड अंजनगाव सुर्जी यांच्या वतीने गुरुवार (दि. 20 डिसेंबर) रोजी मोठ्या श्रद्धा, आदर आणि सामाजिक जाणीवेतून साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने संत.गाडगेबाबांच्या कार्याचा, विचारांचा व समाजप्रबोधनाचा प्रभावी उजाळा देण्यात आला. कर्मयोगी संत गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील अंधश्रद्धा, दारिद्र्य, अस्वच्छता आणि अन्याय निर्मूलनासाठी अर्पण केले.
“स्वच्छता म्हणजेच देवपूजा” हा संदेश त्यांनी केवळ शब्दांत नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर ठेवला. गावोगावी भिक्षा मागताना मिळालेला पैसा स्वतःसाठी न वापरता त्यांनी धर्मशाळा, शाळा, विहिरी आणि रुग्णालयांच्या उभारणीसाठी दिला, हे त्यांच्या निस्वार्थ सेवेचे जिवंत उदाहरण असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
याप्रसंगी संत श्री.गाडगे महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी मनःपूर्वक आदरांजली वाहिली. संतांच्या विचारांप्रमाणे स्वच्छता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश समाजात रुजवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला सीमा बोके (प्रदेशाध्यक्ष), सारिका मानकर (तालुका अध्यक्ष), मीना कोल्हे (विभागीय कार्याध्यक्ष), सारिका ज्ञा. धामोळे (ग्रामअध्यक्षा), संध्या फोकाटे, मिना कोल्हे, स्मिता लहाने, स्वाती मानकर (सहसचिव), स्वाती सरायकर, श्रद्धा ठाकरे, पूजा घोगरे, शुभांगी पांडे (उपाध्यक्ष), वर्षा सावरकर, श्वेता कुकडे, सुमित्रा दगे, प्रतिभा पाटील, नीलिमा कडू, कविता काळे, जयश्री देशमुख, वंदना कोल्हे, मोना माटे, ज्योती शेळके यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातून संत गाडगेबाबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजहितासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार करण्यात आला.



