📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बीडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अडीच हजार नवीन पथदिवे बसवावेत

बीडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अडीच हजार नवीन पथदिवे बसवावेत
बीड न.प.च्या भाजप गटनेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
बीड (प्रतिनिधी)
दि.१ : आगामी गणेशोत्सवासह सणांच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात नगरपरिषदेने तातडीने २५०० नवीन पथदिवे खरेदी करावेत आणि गणेशोत्सव मंडळे असलेल्या प्रमुख मार्गांवर व चौकांमध्ये हे पथदिवे तातडीने बसवून ते कार्यान्वित करावेत, अशी मागणी भाजपच्या बीड नगरपरिषदेच्या गटनेत्या डॉ.सारिकाताई योगेश क्षीरसागर यांनी मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांच्याकडे मंगळवारी (दि.१) केली आहे.
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, बीड शहराचा विस्तार झपाट्याने होत असून सध्या अनेक प्रमुख रस्ते व कॉलनी भागातील स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत आहेत. यामुळे नागरिकांना व विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. शहरात ज्या खांबांवर दिवे बंद आहेत ते त्वरित सुरू करणे आणि ज्या ठिकाणी अद्याप दिवेच नाहीत, अशा ठिकाणी सुमारे ५ हजार नवीन पथदिव्यांची गरज आहे. लवकरच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून पाठोपाठ दसरा, दिवाळी आणि हिवाळा ऋतू सुरू होत आहे. या काळात रात्रीच्या वेळी नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेचा विचार करून नगर परिषदेने तातडीने किमान २५०० नवीन पथदिवे खरेदी करावेत आणि गणेशोत्सव मंडळे असलेल्या प्रमुख मार्गांवर व चौकांमध्ये हे पथदिवे तातडीने बसवून ते कार्यान्वित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजपच्या बीड नगरपरिषदेच्या गटनेत्या डॉ.सारिकाताई योगेश क्षीरसागर यांच्यासह गणेश वाघमारे, संजय उडाण, राणा चव्हाण, शुभम धूत, ॲड.नागेश तांबारे, राहुल गुरखुदे, मुस्तफा सय्यद, मुन्ना गायकवाड, नंदकिशोर पिंगळे, नितीन साखरे, मंगेश धोंगडे, ॲड.गोविंद शिराळे, आदित्य माने, अमोल पौळ, किरण बेद्रे, विशाल राऊत, शिवराज शिरसाट, मिलिंद ठोकळ आदींची उपस्थिती होती.
चौकट
गणेशोत्सवापूर्वी रोड क्रॉसिंग करा
गणेशोत्सवाच्या काळात विविध गणेश मंडळांच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर व आवश्यक ठिकाणी रोड क्रॉसिंगची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली. यामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीचे नियोजन सुलभ होण्यास मदत होणार आहे.
चौकट
खड्डेमय रस्त्यांवर मुरूम टाकण्याची मागणी
शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था खराब असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवापूर्वी नागरिकांना आणि गणेशभक्तांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी यासाठी आवश्यक ठिकाणी तातडीने मुरूम टाकून रस्ते वाहतुकीयोग्य करावेत, अशी मागणीही करण्यात आली.
चौकट
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा
बीड शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित नियमांचे पालन करून भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
Back to top button