📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

गेवराई येथे आंतरधर्मीय सौहार्दाचा आदर्श कार्यक्रम; मशीद हाफिजिया परिचय सादर

गेवराई येथे आंतरधर्मीय सौहार्दाचा आदर्श कार्यक्रम; मशीद हाफिजिया परिचय सादर
गेवराई (जि. बीड): दि. 24 एप्रिल 2026 रोजी जुहर नमाजानंतर मशीद हाफिजिया, गेवराई येथे सद्भावना मंच गेवराईच्या वतीने “मशीद परिचय” या विषयावर एक महत्त्वपूर्ण व अर्थपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विविध धर्मीय बांधवांना मशिदीचे महत्त्व व इस्लामच्या शिकवणीबद्दल माहिती देण्यात आली।
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रफीक पारनेकर होते. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की सर्व मानव एकाच आई-वडिलांची संतती आहेत, त्यामुळे आपण सर्व भाऊ-बहिणी आहोत. देश व समाजाच्या प्रगतीसाठी जात-पात आणि धर्म यापलीकडे जाऊन विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कुरआन, बायबल, ज्ञानेश्वरी आणि सूफी संत यांच्या शिकवणीत मानवता, प्रेम व बंधुभाव हाच मुख्य संदेश असल्याचे त्यांनी सांगितले।
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ता दिगंबर आर्दड (मोटे), ज्ञानेश्वरी दिगंबर आर्दड व विलास सोनवणे यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की आपण सर्व एकच आहोत आणि एकाच आई-वडिलांची संतती आहोत, त्यामुळे समाज व देशाची प्रगती शांतता, एकता आणि बंधुभावाशिवाय शक्य नाही. त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच विलास सोनवणे सर यांनी सद्भावना मंचच्या तात्पुरत्या स्थापनेची घोषणा केली।
कार्यक्रमाच्या शेवटी पाहुण्यांना कुरआनचे मराठी भाषांतर तसेच इतर माहितीपूर्ण व शैक्षणिक पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली, ज्याचा त्यांनी आनंदाने स्वीकार केला।
या कार्यक्रमास बीड येथून सय्यद शफीक हाशमी, माजी प्राचार्य घियासुद्दीन सर, इंजिनिअर मुजाहिद कादरी, परळी येथून सय्यद इफ्तेखार साहेब तसेच गेवराई येथील मोहम्मद इलियास सर, सय्यद एजाज आणि शेख नवाब भाई आदी मान्यवर उपस्थित होते।
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहम्मद इलियास सर आणि सय्यद एजाज यांनी विशेष परिश्रम घेतले, त्यांच्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले।
हा कार्यक्रम आंतरधर्मीय ऐक्य, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचा एक उत्कृष्ट नमुना ठरला असून सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे।
Back to top button