महाराष्ट्र

दहीगाव रेचा येथे बेमुदत उपोषण आंदोलन रस्ता दुरुस्ती व नूतनीकरणासाठी शासन-प्रशासनाकडे मागणी

महेंद्र भगत तालुका प्रतिनिधी | अंजनगाव सुर्जी

राष्ट्रीय महामार्गालगत असलेला अंजनगाव सुर्जी ते दहीगाव रेचा हा महत्त्वाचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून त्याची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी करत दहीगाव रेचा येथे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. अंजनगाव सुर्जी ते दहीगाव रेचा हा रस्ता दहीगाव रेचा, शेलगाव, वढाली, धाडी, जनोना, गरजधरी, पळसखेड, खिरपाणी तसेच मेळघाट परिसरातील गावांना व जंगल भागांना जोडणारा अतिशय महत्त्वाचा दळणवळण मार्ग आहे. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंजनगाव सुर्जी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने अनेक नागरिकांना रोजच्या कामानिमित्त, शासकीय कामे, बाजारपेठ, शिक्षण व आरोग्य सेवांसाठी या रस्त्याने ये-जा करावी लागते. खराब रस्त्यामुळे विद्यार्थी, वृद्ध, गंभीर रुग्ण तसेच गर्भवती महिलांना रुग्णालयात पोहोचवताना रुग्णवाहिका व वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याशिवाय शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात विक्रीसाठी नेण्यासाठीही याच रस्त्याचा वापर करावा लागतो. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे वाहतूक खर्च वाढत असून शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसत आहे. “रस्ता म्हणजे विकास” असे मानले जाते; मात्र रस्ता नसल्यास विकासाच्या अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण होतात, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

या सर्व समस्यांकडे शासन-प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे व रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीसाठी ग्रामगीता आचार्य मनोहर रेचे यांनी 12 मार्चपासून अन्नत्याग करत बेमुदत उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे.

या आंदोलनाला श्री गुरुदेव सेवा मंडळ, वारकरी संप्रदाय, समता सैनिक दल, सिद्धार्थ नवयुवक मंडळ, श्री महादेव संस्थान, सर्व बचत गट, गायत्री परिवार, नित्यानंद भक्त मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, छत्रपती ग्रुप, ऑटो रिक्षा युनियन, सर्व विद्यार्थी गण, श्री जगदंबा देवी संस्थान, शेतकरी संघटना, सर्व नोकरदार वर्ग, प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार विद्यार्थी संघटना, अंजनगाव तालुका गुरुदेव सेवा मंडळ, लोकजागर संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती, उडान चॅरिटेबल ट्रस्ट तसेच दहीगाव रेचा ग्रामवासी व पंचक्रोशीतील नागरिकांनी साखळी व लाक्षणिक उपोषणाद्वारे पाठिंबा दर्शविला आहे.

प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Back to top button