महाराष्ट्र

पुणे येथील महात्मा फुले वाडा भाडेतत्वावर देण्याच्या मागणीला जिजाऊ ब्रिगेडचा विरोध

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधी;

अंजनगाव सुर्जी : पुणे येथील महात्मा फुले वाडा भाडेतत्वावर समता परिषदेकडे चालविण्यास द्यावे, अशी माननीय मंत्री छगन भुजबळ यांनी केलेली मागणी तात्काळ फेटाळण्यात यावी, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेड अंजनगाव सुर्जीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले वाडा हा आपल्या देशाचा ऐतिहासिक ठेवा असून सर्व नागरिकांचा समान वारसा आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे हा वाडा खाजगी संस्था किंवा व्यक्तींना चालविण्यास देण्याचा प्रस्ताव चुकीचा असल्याचे मत जिजाऊ ब्रिगेडने व्यक्त केले.

महिला पदाधिकाऱ्यांनी पुढे नमूद केले की, सध्याच्या परिस्थितीत कोणताही नागरिक स्वच्छंदपणे वाड्याला भेट देऊ शकतो. जयंती, पुण्यतिथी तसेच विविध स्मृतिदिनी महिला आणि नागरिक येथे येऊन फुले दांपत्यांना वंदन करतात, स्तवने गातात आणि आपली भावना व्यक्त करतात. हा वाडा आम्हा सर्वांसाठी ‘हक्काचे स्थान’ आहे, असे त्यांनी सांगितले.

त्या अनुषंगाने, वाडा भाडेतत्वावर देण्यासंदर्भात कोणतीही परवानगी शासनाने किंवा पुरातत्त्व विभागाने देऊ नये, अशी नम्र विनंती निवेदनात करण्यात आली. तसे न झाल्यास जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रभर व्यापक आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला.

निवेदन देताना प्रदेशाध्यक्ष सीमा बोके, तालुकाध्यक्ष सारिका मानकर, विभागीय कार्याध्यक्ष मीना कोल्हे, सुषमा कोकाटे, सोनल निमकाडे, शितल बोके, जयश्री देशमुख, प्राजक्ता सरोदे आणि मीनाक्षी घुबडे उपस्थित होत्या.

Back to top button