बीड

कर्जत नगरपंचायतीत आ.रोहित पवारांना जोरदार धक्का; गटनेते बदलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडून फेटाळली

कर्जत नगरपंचायतीत आ.रोहित पवारांना जोरदार धक्का; गटनेते बदलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडून फेटाळली

कर्जत (अहिल्यानगर), २६ एप्रिल – कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून, आ.रोहित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा गटनेता बदलण्यासाठी रोहित पवार समर्थकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली मागणी अखेर फेटाळण्यात आली आहे.

आ.रोहित पवार गटाने अमृत काळ दाते यांची गटनेतेपदी नियुक्ती व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे औपचारिक प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर सुनावणी घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत, सध्याचे गटनेते संतोष मेहत्रे आणि उपगटनेते सतीश पाटील यांची नेमणूक कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे.

या निर्णयामुळे कर्जत नगरपंचायतीमधील आ.रोहित पवार गटाची सत्ता डळमळीत झाली असून, येत्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

गटनेते संतोष मेहत्रे यांना आता संपूर्ण गटाला व्हीप बजावण्याचा अधिकार मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर जर कुठलेही नगरसेवक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्हीपच्या विरोधात मतदान करताना आढळले, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपंचायतीतील सत्तेच्या समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याची चिन्हे आहेत.

कर्जत मधील या राजकीय उलथापालथीमुळे स्थानिक राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून, आ.रोहित पवार यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Back to top button