बीड
एसएफआयचे ४४वे माजलगाव तालुका अधिवेशन संपन्न !

एसएफआयचे ४४वे माजलगाव तालुका अधिवेशन संपन्न !
तालुका अध्यक्षपदी पवन चिंचाणे तर तालुका सचिवपदी आनंद सक्राते यांची निवड !
माजलगाव (ता. २८ ) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसएफआय) ४४वे माजलगाव तालुका अधिवेशन आज शुक्रवार दिनांक २८ मार्च २०२५ रोजी शहरात संपन्न झाले. या अधिवेशनाने एसएफआयची १५ सदस्यांची नवीन माजलगाव तालुका समिती निवडली. त्यात अध्यक्ष म्हणून पवन चिंचाणे तर सचिव म्हणून आनंद सक्राते यांची निवड झाली आहे.
शहरातील वीज कामगार पतसंस्था कार्यालय येथे झालेल्या अधिवेशनाच्या मंचला एसएफआयचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड सिताराम येचुरी यांचे, सभागृहास स्वातंत्र्यसेनानी कॉम्रेड नानासाहेब पोकळे यांचे आणि परिसराला कॉम्रेड सय्यद हामेद हुसेन नगर असे नाव दिले गेले होते. एसएफआयचे ध्वज फडकावून आणि शहीद भगतसिंग यांना अभिवादन करून अधिवेशनाची सुरुवात झाली. सभागृहात सर्वप्रथम शोकप्रस्ताव मांडून मागील वर्षभरात मृत्यू पावलेल्यांना आदरांजली वाहण्यात आली.
अधिवेशनाचे उद्घाटन किसान सभेचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड मुसद्दीक बाबा सर यांनी केले. एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य सचिवमंडळ सदस्य संतोष जाधव, जिल्हा अध्यक्ष लहू खारगे यांनी अधिवेशनाला मार्गदर्शन केले. डीवायएफआय च्यावतीने फारुक सय्यद, संदीपान पाडमुख, दिगंबर मांडवगणे यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी सत्रात अध्यक्षमंडळाचे कामकाज पवन चिंचाणे, हर्षद डाके आणि अर्पिता सक्राते यांनी तर संचालन कमिटीचे काम आनंद सक्राते आणि रामेश्वर जाधव यांनी केले. रवि राठोड, विशाखा आणि आरती यांनी मिनिट्स कमिटीचे तर यशवंत आणि अभिजित यांनी रजिस्ट्रेशन कमिटीचे कामकाज पाहिले.
अधिवेशनात मागील कार्याचा आणि संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल पवन चिंचाणे यांनी मांडला. या अधिवेशनामध्ये शाळा, महाविद्यालयात मुलींसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी लढा तीव्र करा. मागेल त्या विद्यार्थ्याला वसतिगृह मिळावे यासाठी लढा तीव्र करा. ग्रामीण भागातील बस व्यवस्था सुरळीत करा व विद्यार्थ्यांना मोफत बस पास द्या. जिल्हा परिषद शाळा दत्तक देण्याचा व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडा. नवीन शैक्षणिक धोरण रद्द करण्यासाठी लढा तीव्र करा. आदी शिक्षणविषयक ठराव मांडण्यात आले. या अधिवेशनात सहभागी प्रतिनिधींनी चर्चेत भाग घेतला आणि आपले मत मांडले. त्यानंतर अहवाल आणि ठराव एकमताने संमत करण्यात आले.
या अधिवेशनात १५ सदस्यांची नवीन माजलगाव तालुका समिती निवडण्यात आली. त्यामध्ये नवीन तालुका अध्यक्ष म्हणून पवन चिंचाणे यांची तर तालुका सचिव म्हणून आनंद सक्राते यांची एकमताने निवड करण्यात आली. तालुका उपाध्यक्ष म्हणून रामेश्वर जाधव तर सहसचिव हर्षद डाके व सचिवमंडळ सदस्यपदी अर्पिता सक्राते यांची निवड करण्यात आली.
नवीन तालुका कमिटीमध्ये सदस्य म्हणून संदीप इंगळे, यशवंत सक्राते, अभिजित जाधव, आरती सोनकांबळे, अंकिता मेढे, तुकाराम गिरगुने, कृष्णा काळे, प्रणव झोडगे, अर्चना जाधव, अजय डाके यांची निवड करण्यात आली आहे. या अधिवेशनासाठी माजलगाव तालुक्यातील वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेणारे तसेच वेगवेगळ्या गाव कमिटीचे विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते. अधिवेशनाच्या समारोप सत्रात एसएफआयचे राज्य व जिल्हा नेतृत्व आणि नूतन पदाधिकारी यांचे मनोगत झाले. “हम होंगे कामयाब” या स्फूर्तीगीताने अधिवेशनाचा शेवट करण्यात आला.



