बीड

प्रियंका मुरलीधर गिरी ची कारागृह पोलीस विभागात निवड – श्री बंकटस्वामी महाविद्यालयात सत्कार समारंभ

प्रियंका मुरलीधर गिरी ची कारागृह पोलीस विभागात निवड – श्री बंकटस्वामी महाविद्यालयात सत्कार समारंभ
बीड प्रतिनिधी दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील कॅडेट प्रियंका मुरलीधर गिरी हिची नुकतीच कारागृह पोलीस, संभाजीनगर येथे निवड झाली. या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयात भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.या समारंभात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धांडे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे तसेच राष्ट्रीय छात्रसेना प्रमुख डॉ.जगन्नाथ चव्हाण यांनी प्रियंका चा शाल बुके देऊन गौरव केला.
या समारंभाला प्रियंकाचे नातेवाईक गिरधारी गिरी,महादेव गिरी, श्रीकांत गिरी, अश्विनी गिरी व सुनिता गिरी हेही उपस्थित होते.
प्रियंका गिरी अतिशय सामान्य व गरीब कुटुंबातील असूनही तिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश मिळवले. तिचे आई-वडील शेतात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरात कोणीही सुशिक्षित नसताना, प्रियंकाने केवळ जिद्द, चिकाटी व मेहनत आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर कारागृह पोलीस विभागामध्ये आपले स्थान निर्माण केले.
या वेळी प्रियंका ने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,
महाविद्यालयातील शिस्तबद्ध वातावरण, राष्ट्रीय छात्रसेनेचे प्रखर प्रशिक्षण, आणि डॉ. जगन्नाथ चव्हाण सरांनी ग्रामीण विद्यार्थ्यांबद्दल दाखवलेली तळमळ व आत्मीयता यामुळेच मी आज या पदावर पोहोचू शकले.
तिने पुढे सांगितले की, अर्ज भरतानापासून ते नोकरीत रुजू होईपर्यंत चव्हाण सरांनी दिलेले मार्गदर्शन हेच तिच्या यशाचे प्रमुख कारण आहे.या कार्यक्रमादरम्यान प्राचार्य डॉ. शंकर धांडे यांनी एनसीसीच्या उपक्रमांबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेतील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत सदैव आपल्या महाविद्यालयात मार्गदर्शन व विविध संधी देण्यासाठी कायम तत्पर असल्याच्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी राष्ट्रीय छात्र सेनचे विद्यार्थी या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयात  मिळणाऱ्या मार्गदर्शना बद्दल समाधान व्यक्त केला. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी प्रियंकाचे कौतुक करत तिच्या भविष्यास शुभेच्छा दिल्या.
प्रियांकाचे यश हे आर्थिक अडचणींवर मात करून जिद्दीने यश कसे मिळवता येते याचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button