रायगड

विजय म्युझिक अकॅडमी गोरेगांव आयोजित “तबला पेटी वादन शिबिर २०२५” यशस्वीरीत्या संपन्न

विजय म्युझिक अकॅडमी गोरेगांव आयोजित “तबला पेटी वादन शिबिर २०२५” यशस्वीरीत्या संपन्न

प्रसिद्धी प्रमुख- लवेश साळवी

दि. २९ मे २०२५, मौजे गोरेगांव, तबला आणि पेटी ही भारतीय संगीतातील अत्यंत महत्त्वपूर्ण वाद्ये आहेत. तबला हे लयबद्ध वाद्य आहे, तर पेटी हे स्वर वादन करणारे वाद्य आहे. दोघेही संगीतामध्ये वेगळे आणि महत्त्वाचे योगदान देतात. तबला आणि पेटी हे भारतीय संगीतातील अविभाज्य घटक आहेत. दोन्ही वाद्ये विविध प्रकारच्या संगीतामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे संगीत रचना आणि वादन करता येते. संगीत म्हणजे जीवनाचा प्राण! रोजच्या घाईगर्दीच्या व कामाच्या व्यापात, चिंतेच्या वणव्यात आणि निरस आयुष्यात प्राण फुंकण्याचे काम करते ते केवळ संगीतच.
संगीतामुळेच आपले जीवन सुसह्य झाले आहे. निसर्गातील पक्ष्यांचा किलबिलाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, पापण्यांची उघड-झाप, हृदयाचे ठोके, श्वासांची स्पंदने, बाळाचे खुद्कन हसणे या सर्व बाबींमधून संगीताची अनुभूती येते. कदाचित यातूनच पुढे गायन, वादन व नृत्याचे निर्माण झाले असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. भारतीय संगीत हे स्वर, ताल व लय या तत्वावर आधारित आहे. कोणत्याही कलेच्या परिपूर्तीसाठी, स्वराबरोबर लयसुद्धा महत्वाची असते व काल-मापनावरच संगीत अवलंबून असते. ताल हा संगीताचा प्राण आहे. अशा या तालासंदर्भात ‘भक्तिरत्नाकर’ या ग्रंथात एकसुंदर श्लोक सुद्धा लिहून ठेवला आहे.
सौ. वृंदा अक्षय साळुंके यांच्या संकल्पनेतून दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या तबला आणि पेटी वादनाच्या संगीत शिबिरास, या वर्षीही उदंड प्रतिसाद मिळाला. मागील वर्षीच्या अभूतपूर्व यशानंतर यावर्षी देखील दिनांक ०१ मे २०२५ ते २६ मे २०२५ या दरम्यान संगीत शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी संगीत वाद्ये शिकायला हवी, कारण यामुळे त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता वाढते, तसेच ते सामाजिक आणि भावनिकदृष्ट्याही अधिक सक्षम होतात. संगीत शिकल्याने विद्यार्थ्यांना एकाग्रता, स्मरणशक्ती आणि समन्वय यांसारखी कौशल्ये विकसित होतात, जी त्यांच्या शैक्षणिक जीवनातही मदत करतात. शालेय अभ्यासक्रम आणि इतर विषयांचे क्लास यामधून या विद्यार्थ्यांना नियमित क्लासला येणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर घेण्यात येते व हा या अकॅडमी चा मूळ हेतू आहे. तसेच शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या फुकट जाऊ नये, काहीतरी नवीन शिकावे, सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा, यासाठीच हे शिबिर राबवण्यात येते. यामध्ये तबला आणि पेटी वादनाचे प्रारंभिक धडे, तसेच पेटी शिकणाऱ्यांसाठी राग, रागावर आधारीत सरगम गीते, राष्ट्रगीत, प्रार्थना इ. देण्याचा प्रयत्न केला. या शिबिरात जे विद्यार्थी नियमित क्लास ला येतात त्यांनी सुद्धा शिबिरात येऊन भरपूर रियाज केला. तसेच जे विद्यार्थी तबला शिकत आहेत त्यांनी शिबिरात पेटी वादनासाठी, तर पेटी शिकणाऱ्यांनी तबल्यासाठी प्रवेश घेतला.
सन २०१० साली स्थापन झालेल्या या संगीत क्लासेस ने संगीत शिक्षण देण्याचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील, तळागाळातील विद्यार्थ्यांना संगीत कलेचे शिक्षण मिळावे, त्यांच्या कालगुणांना वाव मिळावा आणि पारंपरिक वारसा असलेली भारतीय संस्कृती व कला जोपासावी, हा या संस्थेचा आणि संचालक व प्रशिक्षक श्री अक्षय विजय साळुंके यांचा मूळ उद्देश आहे.

Back to top button