बीड
बीड मतदारसंघातील प्रश्न आ.क्षीरसागरांनी सभागृहात गाजवले

बीड मतदारसंघातील प्रश्न आ.क्षीरसागरांनी सभागृहात गाजवले
ग्रामीण भागातील थांबलेली कामे, बीड शहराचा पाणीपुरवठा आदी महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्याची केली मागणी
मुंबई दि.२० (प्रतिनिधी):- बीड मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडून आ.संदीप क्षीरसागरांनी गुरूवारी (दि.२०) रोजी सभागृहाचे लक्ष वेधले. मतदारसंघात विकासकामांना मिळालेला निधी कोविड काळात वळविल्याने रखडलेली कामे, ग्रामीण भागातील शाळांची दुरूस्ती करणे तसेच विविध सोयी-सुविधा उपलब्ध करणे, रस्ते दुरुस्ती, पुल दुरूस्ती करणे आदी मुद्दे आ.क्षीरसागरांनी अधिवेशनात गाजवले.
बीड मतदारसंघात असलेले श्री क्षेत्र कपीलधार देवस्थान हे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून देखील भाविक याठिकाणी येत असतात. कोवीड काळाअगोदर श्री क्षेत्र कपीलधार देवस्थानच्या विकासासाठी १०० कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर झाला होता. परंतु कोवीडच्या महामारी काळापासून याबाबतची कार्यवाही ठप्प झाली. त्यामुळे महाराष्ट्रभरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र कपीलधारचा विकास करण्यासाठी शासनाने निधीची तरतूद करावी. यासोबतच बीड मतदारसंघात एकूण ३५० शाळा आहेत, त्या शाळांमधील ५९२ शाळा खोलींची अतिशय दुरावस्था झाली आहे म्हणजे त्या अक्षरशः पडतीला आल्या आहेत. ६३ वस्तीशाळांच्या इमारतींसाठी निधीची गरज आहे. तसेच ग्रामीण भागातील अनेक रस्ते आणि पूल दुरूस्तीला आले आहेत त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ मधून मंजूरी देण्यात याव्यात. अनेक ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतींची मागणी सातत्याने होत आहे. त्यासाठी निधी देण्यात यावा. या महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकून आ.संदीप क्षीरसागर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
चौकट (अतिमहत्त्वाचे)
विमानतळ होतय ही आनंदाची बाब पण….
बीडमध्ये विमानतळ होणार. या कामासाठी निधीची तरतूद करून याबाबतच्या कार्यवाहीला लवकरच सुरूवात करण्यात येईल अशी घोषणा याच आठवड्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार साहेबांनी याचा मनस्वी आनंद आहे. त्याबद्दल ना.अजितदादांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. परंतु बीड शहरात रहिवास करणार्या ३ लाख लोकांना पाण्यावाचून कधीपर्यंत वेठीस धरायचे! योजना आणि पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांचे हाल कधीपर्यंत होऊ द्यायचे? ३६ कोटी रूपयांची तातडीने तरतूद करून बीड शहराचा मुलभूत प्रश्न देखील प्राधान्याने मार्गी लावला पाहिजे अशी मागणी आ.संदीप क्षीरसागरांनी बीड शहराच्या जिव्हाळ्याचा असलेल्या पाणी प्रश्नावर केली. त्यासोबतच बीड येथील एमआयडीसीचा विकास करून बीड जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा मार्गही सुकर करावा अशी आग्रही मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात केली.



